भारताच्या संविधानाला जगातील सर्वोत्तम संविधान म्हणून गौरविले जाते. त्याचे कारणही तसेच आहे हे संविधान बनवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र मेहनत घेतली आहे. देशातील एका मागासवर्गीयाने संविधान लिहून उपेक्षितांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार मिळवून दिले. मागासवर्गीयांना इतरांच्या बरोबरीने संधी निर्माण व्हावी म्हणून संविधानात आरक्षणाची तरतूद केली. महिलांना समान अधिकार दिले. आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्यांनाही आरक्षणाची तरतूद केली. संविधानामध्ये प्रत्तेक नागरिकाला, महिलांना समान अधिकार मिळाले आहेत.
नेमके हेच भारताचा हिंदुस्तान करू पाहणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांना खटकले आहे. फक्त ब्राम्हणांच्या हातात भारताची सर्व सूत्र हवीत अशी यांची इच्छा आहे. हि इच्छा गेले कित्तेक वर्षे यांना पूर्ण करता आलेले नाही. अटलबिहारी वाजपेयी यांचे कित्तेक पक्षांचे सरकार असल्याने त्यांना संविधान बदलण्याचा अजेंडा राबवता आला नाही. आता यावेळी जनतेला भुलवून, सोशल आणि मिडीयाचा वापर करून अबकी बार मोदी सरकारचा नारा घरा घरात पोहोचवून भाजपाला लोकसभेत बहुमत प्राप्त करून केंद्रात सरकार स्थापन करता आले आहे. केंद्रात बहुमताचे सरकार स्थापन केल्याने भाजपाला आता आपला छुपा अजेंडा राबवणे सोपे झाले आहे.
भारताचे संविधान बदलायचे झाल्यास दोन तृतीयांश बहुमताने ते बदलता येवू शकते. तसे बहुमत सध्या भाजपाकडे आहे. परंतू लोकसभेत जरी संविधान बदल केला तरी राज्यसभेची आणि नंतर भारतातील सर्व राज्यांच्या विधानसभांची त्याला मंजुरी आवश्यक आहे. यामुळे येणाऱ्या काळात लोकसभेमध्ये असलेल्या बहुमताच्या जोरावर राज्यसभेमध्ये भाजपचे जास्तीत जास्त लोक पाठवले जाऊन राज्यसभा ताब्यात घेतली जाईल. यांना अडचण आहे ती राज्यांच्या विधानसभांची, त्यासाठी सर्व राज्यांमध्ये आपली सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे.
भारतीय संविधान आणि महाराष्ट्राचे वेगळे नाते आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे महाराष्ट्राची ओळख आहे. येथील राजकीय पक्ष सुद्धा फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेवून सत्तेवर आले आहेत. भारताची राज्यघटना सुद्धा महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आहे. यामुळे राज्य घटना मोडीत काढण्याचा छुपा अजेंडा राबवणाऱ्याना व्यसन घालण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेला आणि मतदारांना करावे लागणार आहे. "अच्छे दिन आले वाले है" असे आश्वासन देणाऱ्या मोदी यांनी सत्तेत येताच गरिबांच्या फायद्यासाठी असलेले कित्तेक कायदे रद्द केले आहेत. गरिबांसाठी स्वस्तात असलेल्या औषधांच्या किमती कित्तेक पटीने वाढवून गरिबांना परवडणार नाही अश्या या औषधांच्या किमती वाढवून ठेवल्या आहेत.
मोदीनी केंद्रात सत्ता दिल्यास महागाई रोखली जाईल असे आश्वासन दिले होते हे आश्वासन सरकारला पाळता आलेले नाही. यामुळे काँग्रेस आणि भाजपाच्या सरकारवर मध्ये कोणताही फरक नसल्याचे भारतातील सामान्य जनतेला कळून चुकले आहे. "मिशन २०२५" हे आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटनानकडून राबवले जात आहे. २०२५ पर्यंत आरएसएसला भारताला हिंदुस्तान करायचा आहे. त्यासाठी त्यांना संविधानात बदल करायचा आहे. यासाठी सध्या महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. येणाऱ्या काळात ज्या ज्या राज्यात निवडणुका होतील त्या निवडणुका जिंकण्याचा भाजपा प्रयत्न करेल.
महाराष्ट्रातील निवडणुका जिंकण्यासाठी वृत्तवाहिन्यांसोबत भाजपाने साटेलोटे केले असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपाला विधानसभेत जास्तीतजास्त जागा मिळतील असे दाखवण्यात येत आहे. असे वृत्तवाहिन्यांनी दाखवल्याने मतदारांवर प्रभाव पडून आपोआपच मतदार भाजपाला मत देणार आहेत. सत्ता मिळवण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जात आहे. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र नंबर १ असताना विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने "कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा" हि जाहिरात बनविली होती. यामधून इतर पक्षांच्या राज्यकर्त्यांनी काहीच केले नसल्याचे दर्शवण्यात आले होते. परंतू या जाहिरातीचे हसे झाल्याने भाजपा तोंडघशी पडला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान याच सदरातून लेख लिहून महाराष्ट्रातून एकही बौद्ध खासदार निवडून येवू नये म्हणून बहुतेक राजकीय पक्षांनी बौद्ध उमेदवार दिले नाहीत असे लिहिले होते. महाराष्ट्रात बौद्धांवर अन्याय अत्याचार झाल्यास त्याचा आवाज संसदेपर्यंत पोहचू देता कामा नये. अश्या अन्याय अत्याचाराचा दाबून टाकण्याचे असे षडयंत्र त्यामागे होते असे या लेखामधून सविस्तर मांडले होते. परंतू बौद्धांनी याकडे दुर्लक्ष करून हे षडयंत्र यशस्वी करण्यास मदत केली आहे. लोकसभेत केलेल्या चुकीचे फळ आता येणाऱ्या काही वर्षात बौद्धांना नक्की मिळणार आहे. हे मिळणारे फळ किती कडू आहे हे बौद्धांना समजे पर्यंत खूप उशीर झालेला असेल.
स्वताला बौद्ध समाजाचे नेते म्हणवणारे रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले यांना सुद्धा एक राज्यसभेची खासदारकी देवून भाजपाने विकत घेतले आहे. भाजपाचा हा अजेंडा समोर येत असताना आठवले यांनी भाजपाच्या महायुतीला लाथ मारून त्यांच्या विरोधात रान उठवण्याची गरज होती. परंतू भिक म्हणून मिळणाऱ्या मंत्रिपदाला भुलून आठवले यांनीही भाजपाला साथ देण्याचे काम केले आहे. यामुळे आठवले यांनीही राज्यघटना बदलण्याच्या भाजपाच्या अजेंड्याला छुपा पाठींबा दिला आहे असेच म्हणावे लागेल. महागाई वाढत चालली आहे ती भाजपा सरकारला रोखता आलेली नाही, गरिबांच्या औषधांच्या किमती वाढल्या आहेत, गरिबांसाठी असलेले कायदे रद्द केले गेले आहेत तरीही आठवले यांनी आपले तोंड बंद ठेवले आहे.
आताही आम्ही जनतेला, मतदारांना संविधान बदलण्याचा अजेंडा राबवला जात असल्याचे सांगत आहोत. लोकसभेमध्ये जी चूक झाली ती पुन्हा होऊ देवू नका. भारताचे संविधान वाचवण्याची मोठी जबाबदारी आंबेडकरी अनुयायी म्हणवणाऱ्या प्रत्तेकावर आहे. कोणता राजकीय पक्ष मतदानापूर्वी किती पैसे देतो, दारू पाजतो, कपडे, भांडी देतो याचा विचार करून मतदान करू नका. आपल्याला भारताचे संविधान वाचवायचे आहे. हि महाराष्ट्रातील निवडणूक निर्णायक आहे. या निवडणुकीमध्ये चूक झाल्यास येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत याचा प्रत्येकाने विचार करावा……
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment