मुंबई- महाराष्ट्राची बदनामी करणारी जाहिरात म्हणून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर ‘अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ ही जाहिरात गुंडाळून ठेवण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. या जाहिरातींतून चुकीचा आणि राज्याची बदनामी करणारा संदेश जात असल्याने भाजपबद्दल जनतेमध्ये चीड निर्माण झाली होती. सोशल नेटवर्किंग साइटस्वरही या जाहिरातींबाबत निषेध नोंदवले गेले. ही जाहिरात भाजपसाठी अडचणी वाढवत होती. त्यामुळे ती आता बंद करण्यात येणार असून त्याऐवजी दुसरी जाहिरात प्रचारासाठी वापरली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत जाहिराती आणि सोशल नेटवर्किंगचा प्रभावी वापर केल्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही त्याच पद्धतीने प्रचार करण्याची रणनीती भाजपने आखली होती. त्यातून त्यांनी आक्रमक जाहिरातींचा भडीमार केला. ते करत असताना आपणच महाराष्ट्राची बदनामी करत आहोत, हे भानही भाजपला राहिले नाही.
शेवटी या जाहिरातींची चेष्टा केली जाऊ लागली. त्यावर अनेक विनोद तयार झाले. अनेक ठिकाणी या जाहिरातींचा निषेध केला गेला. काही संघटनांनी तर या प्रकरणी भाजपला न्यायालयात खेचण्याची तयारीही केली. मात्र भाजप नेत्यांना ती जाहिरात योग्य आहे आणि प्रभावी आहे असेच वाटत होते. त्यामुळे त्या जाहिरातींचे प्रसारणही वाढवण्यात आले होते. सारखे सारखे तेच तेच दाखवून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लक्तरेच वेशीवर टांगली जात होती. सर्वच राजकीय पक्षांनी भाजपच्या या भूमिकेवर टीका केली होती. वैयक्तिक टीका करा, पक्षावर टीका करा पण महाराष्ट्राबाबत चुकीची माहिती पसरवू नका असा सल्लाही भाजपला काँग्रेससह इतर पक्षांनी दिला होता.
राज्यात या जाहिरातीविषयी असंतोष निर्माण झाला. तेव्हा परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी जाहिरातीच बंद करण्याची नामुष्की पक्षावर आली. दरम्यान टीका होत आहे म्हणून ही जाहिरात बंद करत नसल्याचे भाजपचे प्रवक्ते निरंजन शेट्टी यांनी स्पष्ट केले.