अजित पवारांच्या बॅगेत ४ लाखाची रक्कम सापडली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2014

अजित पवारांच्या बॅगेत ४ लाखाची रक्कम सापडली

अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमधून पूर्णा येथे राहून गेलेल्या बॅगांमध्ये ४ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम सापडली.ही रक्कम गंगाखेड पोलिसांनी जप्त केली असून, तपास सुरू आहे.मंगळवारी अजित पवार हे परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात निवडणूक प्रचारासाठी गेले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरमधील चार बॅग तेथे उतरविण्यात आल्या होत्या. मात्र, पवार त्याच हेलिकॉप्टरमधून परत जाताना त्या बॅग चढवल्या गेल्या नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांना त्या बॅग लातूरच्या शेळके यांच्याकडे पाठविण्याचा निरोप देण्यात आला. त्यानुसार भांबळे यांनी एका (एमएच०९बीएक्स ५२१०) कारमध्ये त्या बॅग ठेवून लातूरच्या दिशेने पाठवून दिल्या. 

बुधवारी सकाळी १०.३० वाजता गंगाखेडलगतच्या परळी चेकनाक्यावर पोलिस पथकाने या कारची तपासणी केली. त्यापैकी दोन बॅगांमध्ये कपडे होते. इतर दोन बॅगांना कुलुपे होती. कार चालक कृष्णा हजारे याने त्या बॅग अजित पवार आणि त्यांचे पीए देशमुख यांच्या असल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी तहसीलदार, निवडणूक अधिकारी आणि काही पंचांना बोलावून घेतले. बॅगांची कुलुपे उघडण्यासाठी त्यांच्या समक्ष किल्ल्या तयार करण्यात आल्या. कुलुपे उघडताच एका बॅगध्ये ४ लाख रुपये, तर दुसऱ्या बॅगमध्ये ८५ हजार रुपये आढळले. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली आणि संबंधितांकडून त्याचे स्पष्टीकरण मागविले आहे.

Post Bottom Ad