मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) - स्त्रियांसाठी राइट टू पीच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात अनंत अडचणी आहेत, अशी कबुली देतानाच या अडचणींवर मात करण्यासाठी आणि स्त्रियांना जास्तीत जास्त सुविधा देण्याकरिता राइट टू पीच्या अधिकाराची अंमलबजावणी व्हावी म्हणून आराखडा तयार करण्यात येत असल्याचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले.
दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त सीताराम कुंटे बोलत होते. राइट टू पीदरम्यान येणार्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. सुविधा देण्यासाठी येणारा गॅप भरून काढण्यासाठी गॅप ऍनालिसीस करण्यात येणार आहे. या कमिटीच्या आतापर्यंत सात बैठका झाल्या असून सुविधा देण्यासाठी आणि राइट टू पीची मोहीम राबविण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे कुंटे म्हणाले.
मुंबईकरांना २४ तास पाणी देण्याकडे महापालिकेची वाटचाल सुरू झाली. मुंबईकरांना २४ तास पाणी या वर्षभरात कसे मिळेल यावर आपला कटाक्ष असेल. याशिवाय अर्धवट प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या.
पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत मुंबईभर ‘स्वच्छ मुंबई’ अभियान राबविण्यात येणार असून वर्षभरात मुंबई स्वच्छ ठेवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. या अभियानात प्रथमच रेल्वेने प्रचंड प्रतिसाद दिल्याचेही कुंटे म्हणाले. तसेच मुंबईला हागणदारीमुक्त करण्यासाठी ‘स्वच्छ अभियान’ त्याला जोडण्यात येणार असल्याचे कुंटे यांनी स्पष्ट केले.