भाजप सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नवनिर्वाचित कॅबिनेटमंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, प्रकाश मेहता, विष्णू सावरा तसेच दिलीप कांबळे व विद्या ठाकूर हे दोन्ही राज्यमंत्रीही उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारवर मोठी जबाबदारी आहे. लोकांच्या अपेक्षांना आम्हाला खरे उतरावे लागेल. लोकांना विकासाचा मार्ग दाखवावा लागेल. राज्यावर जरूर मोठे कर्ज आहे मात्र त्यावर मात करून राज्याला पुढे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न राहील. आमचे सरकार पारदर्शक व कार्यक्षम कसे राहील याची खबरदारी घेणार आहे. सर्वसमावेशक योजना व धोरण राबवून सर्व विभागाचे व्हिजन काय असेल याचे सादरीकरण करून आम्ही प्राधान्यक्रम ठरवून कामे करणार आहोत. तसेच मंत्रिमंडळाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची माहिती आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
शिवसेनेसोबत चर्चा सुरु आहे. काही दिवसात यातून चांगली बाब बाहेर आलेली दिसेल. उद्धव ठाकरेंनी आमच्या शपथसोहळ्याला हजेरी लावली याचा मला आनंद झाला असे सांगून फडणवीस म्हणाले, जनतेच्या अपेक्षेनुसार आम्ही करू. राज्यातील जनतेने आम्हाला सत्तेवर बसविले आहे. त्याला तडा जाऊ देणार नाही. निवडणुकीच्या काळात भाजपने दिलेल्या आश्वासनावर व जाहीरनाम्यातील धोरणानुसार उद्यापासून आमचे सरकार कामकाजाला सुरुवात करेल. मंत्र्यांचे खातेवाटप उद्या जाहीर केले जाईल असेही फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राला पुन्हा एकदा क्रमांक 1 चे राज्य बनवायचे आहे त्यासाठी आम्हाला जनतेची साथ हवी आहे असेही फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितले.