शरद पवार आज सातारामधील पाटण येथे प्रचार दौ-यावर आहेत. पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्या प्रचाराला पवार आले असता त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, भाजपला कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे. त्यासाठी ते वाट्टेल त्या थराला, प्रचाराला जात आहेत. आता भाजपची टीव्हीवर एक जाहीरात येत आहे. म्हणे मागील आमक्या आमक्या वर्षात एवढ्या एवढ्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या. बरं त्या आत्महत्या नव्हे तर हत्या आहेत हत्या आहेत असे जाहिरातीत ठासून सांगितले जात आहे. मात्र, ते चुकीचे आहे.
राज्यात मागील काळात शेतक-यांनी जरूर आत्महत्या केल्या. त्याला अनेक वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, भाजप ज्या पद्धतीने जाहिरातीतून जो चुकीचा प्रचार करीत आहे. त्यातून राज्याचा, महाराष्ट्राचा अवमान होत आहे. देशात आजही जी काही मोजकी प्रगतीशील राज्ये आहेत त्यात महाराष्ट्र खूप वरच्या स्थानावर आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत सत्ता हिसकावून घेण्याची घाई जी भाजपला झाली आहे त्याला जनता चोख उत्तर देईल. राज्यातील जनता भाजपला स्वीकारणार नाही असेही पवारांनी सांगितले.