अँट्रॉसिटीच्या खटल्यातील आरोपीला सक्तमजुरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 October 2014

अँट्रॉसिटीच्या खटल्यातील आरोपीला सक्तमजुरी

पालघर : जातीवाचक शब्द वापरून अपमानित केल्याच्या आरोपावरून कुंभवली येथील निखिल राजेंद्र संखे या आरोपीला पालघरचे अतिरिक्त न्यायाधीश एम. एस. क्षीरसागर यांनी सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा बुधवारी ठोठावली. 

बोईसरजवळील गुंदवली येथे राहणारी अनुसूचित जातीच्या समाजातील एक महिला बोईसर येथील खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कामाला होती. ३ वर्षांपूर्वी ती महिला कामावरून निघून सहा आसनी रिक्षात बसून गुंदवली नाक्यावर उतरली. त्या वेळी तेथे आलेल्या एका उत्तरभाषिक इसमाने त्या महिलेचा हात पकडून विनयभंग केला. तो पळून जाऊ लागला असता, त्या महिलेच्या नातेवाईकांनी त्याला पकडले. मात्र तो इसम त्यांच्या तावडीतून सुटून पुन्हा पळून गेल्यावर त्या महिलेसह नातेवाईक तो इसम राहत असलेल्या ठिकाणी गेले व तुम्ही असे वाईट प्रवृत्तीचे भाडोत्री कशाला ठेवता, असे त्यांनी घरमालक राजेंद्र संखे यांना सांगितले. त्यावरून बाचाबाची झाली व घरमालकाचा मुलगा निखिल राजेंद्र संखे याने रागाच्या भरात त्या महिलेसह तिच्या भावांना जातीवाचक शब्द बोलून त्यांचा अपमान केला.

त्यानंतर या महिलेच्या तक्रारीवरून बोईसर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)१0 नुसार गुन्हा दाखल केला. व या गुन्ह्याचा तपासात तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी एन. के. मुरादे यांनी करून आरोपीला अटक केली होती. या खटल्याची नुकतीच सुनावणी होऊन बुधवारी निकाल लागला. सुनावणीच्या वेळी ५ साक्षीदारांच्या साक्षी झाला. या वेळी सरकारी वकील अँड़ पी. एच. पटेल यांनी सरकार पक्षातर्फे भक्कमपणे बाजू मांडून प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यानंतर समोर आलेले पुरावे व प्रत्यक्षदश्री साक्षीदारांच्या साक्षीवरून न्यायाधीशांनी आरोपीला ६ महिन्यांची सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली पालघर व ठाणे जिल्ह्यातील शिक्षा झालेला हा पहिला खटला असल्याची वकिलात चर्चा सुरू आहे.

Post Bottom Ad