स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी ३०२१ सोनोग्राफी केंद्रांना कायमचे टाळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2014

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी ३०२१ सोनोग्राफी केंद्रांना कायमचे टाळे

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत हाती घेण्यात आलेल्या धडक मोहिमेमुळे राज्यातील ९०१५ सोनोग्राफी केंद्रांपैकी ३०२१ केंद्रांना कायमचे टाळे ठोकण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जनगणनेमध्ये मुलींचा जन्मदर वेगाने खाली येत असल्याचे दिसून आले होते. मुलगाच हवा या अट्टहासातून मुलींना जन्मापूर्वी गर्भातच मारून टाकण्याचे प्रमाण राज्यात वाढले होते. 

स्त्रीभ्रूणहत्यांना चाप लावण्यासाठी आरोग्य विभागासह सामाजिक संस्थांनीही एकत्रितरित्या भरीव प्रयत्न केले. सोनोग्राफी सेंटर्समध्ये येणाऱ्या गर्भवती महिलेची, तिच्या कुटुंबाच्या संपूर्ण माहितीचा रेकॉर्ड ठेवण्यात आला. ज्या केंद्रामध्ये फॉर्म एफची पूर्तता केली जात नाही, तसेच ज्या केंद्रामध्ये लिंगनिदान केले जाते, त्या केंद्राविरोधात धडक कारवाईही करण्यात आली.

जळगाव, बीड, लातूर नाशिक, पुणे, ठाणे या ठिकाणच्या केंद्रामध्ये सुरू असलेल्या स्त्रीलिंगनिदान व गर्भपाताच्या प्रकरणांना चाप लावण्यासाठीही पीसीपीएनडीटी कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला. या सेंटर्सवर छापे टाकणे, स्टिंग ऑपरेशन्सच्या माध्यमातून अवैधरित्या सुरू असलेल्या केंद्रांना सील करण्यात आले. यातील काही केंद्रचालकांनी राजकीय वरदहस्ताचा वापर करून सुटकेसाठी पळवाटाही शोधून काढल्या, मात्र त्या फोल ठरल्या. राज्यातील लिंगनिदान, वैद्यकीय प्रक्रियेची पूर्तता न करणे, अवैधपणे स्त्रीगर्भाचे लिंगनिदान करून गर्भपात करणे, यासारख्या गुन्ह्यांमधील ३०२१ सोनोग्राफी सेंटर्सना कायमचे टाळे लावण्यात आले आहे.

Post Bottom Ad