निवडणुकीत मुंबईत पडणार पैशांचा पाऊस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2014

निवडणुकीत मुंबईत पडणार पैशांचा पाऊस

मुंबई - शहरातील प्रत्येक मतदारसंघात पाच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार मैदानात असल्याने निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार आहे. प्रत्येक उमेदवाराला पाच कोटींपर्यंत खर्च येणार असून, 36 मतदारसंघांत तब्बल 900 कोटींचे वाटप होणार आहे. 


युती व आघाडी असताना इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अडीच ते तीन कोटींच्या खर्चाचा अंदाज केला होता. हा खर्च आता पाच ते सहा कोटींपर्यंत पोहचला आहे. विभागातील मंडळे आणि गृहनिर्माण संस्था युती आणि आघाडीत वाटल्या गेल्या होत्या. आता त्या चार पक्षांत विभागल्या आहेत. पूर्वी 20 ते 25 हजारांत होणारी मांडवली आता 50 ते 60 हजारांपर्यंत पोहचली आहे. या मंडळांची फोडाफोडी झाल्यास हा दर लाखाच्या घरात पोहचू शकतो. प्रचारासाठीही कमी कालावधी असल्याने तसेच कार्यकर्ते विभागले गेल्याने प्रचारफेऱ्या व चौक सभांना गर्दी जमवण्यासाठीही खर्च वाढला आहे. पूर्वी 400 रुपयांत काम करणारे कार्यकर्ते आता सहाशे ते सातशे रुपये मागू लागले आहेत. त्यांच्या जेवणापासून चहापाण्याचा खर्चही वाढला आहे. ओल्या पार्ट्यांवरील खर्चातही वाढ झाली आहे.

प्रचार साहित्याच्या दरात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. पत्रकांची नवी पद्धत, रंगीत माहितीपुस्तिका, टोप्या, बिल्ले यांच्या नव्या पद्धतीमुळे खर्चात वाढ झाली आहे. प्रचारपत्रक- प्रत्येकी एक रुपया 70 पैसे, पुस्तिका- प्रत्येकी दोन रुपये, टोपी- पाच ते सहा रुपये,बिल्ला- दोन ते तीन रुपये, क्रेडिट कार्डसारखे मतदार कार्ड- 25 रुपये इतका दर आकाराला जात आहे. यामुळे यावेळी मुंबईमध्ये प्रचाराच्या वेळी पैश्यांचा पाऊस पडताना दिसणार आहे. 

Post Bottom Ad