मोदींना राष्ट्रीय सुरक्षेचे विस्मरण का - आझाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2014

मोदींना राष्ट्रीय सुरक्षेचे विस्मरण का - आझाद

पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशाला सुरक्षितता देऊ शकत नाही. सीमेवरील परिस्थिती गंभीर असून, पंतप्रधान या बाबतीत गंभीर नाहीत. पंतप्रधानांना आज राष्ट्रीय सुरक्षा का आठवत नाही, असा प्रश्न अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला. 

विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारासाठी आलेल्या आझाद यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारला लक्ष्य केले. आझाद म्हणाले, ‘‘एक ऑक्टोबरपासून सीमेवर तणाव हे देशासाठी चिंताजनक बाब आहे. 1971 नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर सीमेवर गोळीबार होत आहे. एनडीए सरकार सत्तेत येण्याचा हा परिणाम आहे. ‘जो गरजते है वो बरसते नही‘ हा मोदींचा स्वभाव आता पाकिस्तानलाही कळला आहे. मोदी महाराष्ट्रात स्थानिक नेत्यासारखे मते मागत फिरत आहेत. पण, सीमेवर बेघर झालेल्यांबद्दल त्यांना संवेदना नाही. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात असताना लडाखमध्येही घुसखोरी सुरू होती. शपथ विधीच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही मेजवानी दिली होती. शाल आणि साडीचे राजकारण करण्यात मोदी व्यस्त आहेत. पंतप्रधान बनण्याआधी देत असलेले भाषण मोदी आता विसरले आहेत. साठ वर्षांत देशात आणि गुजरातमध्ये झालेला विकास काँग्रेसनेचं केला. मोदी आता फक्त आम्ही बनवलेल्या गोष्टींचं उद्घाटन करत आहेत.‘‘

काँग्रेसविषयी बोलताना आझाद म्हणाले, की काँग्रेस पक्ष काम करण्यात हिरो आणि पब्लिसीटी करण्यात झिरो आहे. याउलट भाजप काम करण्यात झिरो आणि पब्लिसीटी मध्ये हिरो आहे. गुजरात मॉडेल अजून कोणालाच उलगडलेले नाही. भाजपत फक्त एकच नेता आहे ही हुकुमशाहीचे लक्षण आहे. काश्मीरमध्ये आलेल्या पूरात सैन्याने काम केले केंद्र सरकारने नाही. त्याचे श्रेयही भाजप स्वतःकडे घेत आहे. राज्यात भाजपसारखी जाहिरातबाजी करायला काँग्रेसकडे भाजप इतके पैसे नाहीत.

Post Bottom Ad