फिरोजपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे फक्त सरकारचे मार्केटिंग करत असून, ते उद्योगपतींसाठी काम करत आहे. हरियानाचा विकास पाहून जय जवान, जय किसान, जय पहलवान हा नारा दिला पाहिजे, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. हरियाना विधानसभा निवडणुकांसाठी सुरु असलेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
मेवत येथे बोलताना राहुल म्हणाले, ‘‘ते सरकार फक्त उद्योगपतींसाठी चालवत आहेत. आम्ही एक किंवा दोन उद्योगपतींसाठी सरकार चालवत नव्हतो. तसेच तसेच सरकारचे मार्केटिंगही कधी केले नाही. मोदी अमेरिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्करोग, मधुमेहाच्या औषधांच्या किंमती नियंत्रणात होत्या. पण, आता त्यामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखाली हरियानाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. हरियानाच्या विकासात येथील शेतकरी, सैनिक आणि क्रीडापटूंचा मोठा वाटा आहे. त्यामुळे हरियानासाठी जय जवान, जय किसान, जय पहलवान असा नारा दिला पाहिजे.‘‘