मुंबई / अजेयकुमार जाधव
घाटकोपर पूर्व पंतनगर येथील गणेश मंदिरच्या माध्यमातून शिवसेनेने मतदान करून आलेल्यांना स्वस्त साखरेचे वाटप केले आहे. हे साखर वाटप इतर दिवशी न करता मतदानाच्याच दिवशी मतदान केल्याचे हातावरील चिन्ह बघूनच केले गेले आहे. इतर दिवशी असे साखर वाटप न करता मतदानाच्या दिवशीच वाटप का करावे असा प्रश्न स्थानिक लोकांनी उपस्थित केला असून हा उघड उघड आचार संहिता भंगाचा प्रकार असल्याची चर्चा आहे.
पंतनगर गणेश मंदिर येथील बस स्टोप वर महिलांची मतदानाच्या दिवशी सायंकाळी ४ च्या दरम्यान मोठी रांग लागली होती. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी नसताना या महिला या ठिकाणी रांगा लावून का उभ्या आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या महिलांनी शिवसेनेकडून आम्हाला स्वस्त दरात साखरेचे वाटप केले जाणार आहे म्हणून आलो असल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती मिळवली असता, गणेश मंदिर कडून या आधी दरवर्षी असे साखरेचे वाटप केले जायचे. पण नंतर असे स्वस्त साखर वाटप बंद करण्यात आले होते. आता या वर्षी आम्हाला मत द्या आणि नंतर २० रुपयांनी ४ किलो साखर घ्या असा निरोप शिवसैनिकांनी दिला होता म्हणून मतदान करून आम्ही इकडे आलो असल्याचे या महिलांनी सांगितले. हे साखर वाटप दिवाळी सणासाठी असल्याचेही महिलांनी सांगितले.
याठिकाणी शिवसेनेचे काही कार्यकर्ते पक्षाच्या निवडणूक चिन्ह असलेल्या टोप्या घालून महिलांनी आणि रांगेमध्ये असलेल्यांनी मतदान केले आहे का याची खात्री करून घेताने दिसले. ज्यांनी मतदान केले त्यांनाच हि साखर देवू ज्यांनी मतदान केले नाही त्यांनी आधी मतदान करून या नंतर साखर देवू असे या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत होते. महिलांनीही हि साखर वाटप शिवसेनेकडूनच केली जाणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. यामुळे हा प्रकार म्हणजे शिवसेनेला मतदान केल्याच्या बदल्यात स्वस्त दरात साखर वाटप असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांना व उमेदवार असलेल्या जगदीश चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते निवडणुकीत व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही.