मुंबई - निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली असून निवडणुकीतील काळ्या पैशाचा वाढता वापर, मद्याचा वाहणारा महापूर आणि मोठ्या प्रमाणावर होणारा पेड न्यूजचा वापर याला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने तब्बल ९३२ भरारी पथके राज्यभर तैनात केली आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
निवडणुकीच्या तयारीबाबत संपथ यांनी सोमवारी आणि आज असे दोन दिवस राजकीय पक्षांचे नेते, वरिष्ठ सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, आयकर आयुक्त, उत्पादन शुल्क अधिकारी आदी वरिष्ठ अधिकार्यांच्या बैठका घेतल्या. निवडणूक आयोगाच्या तयारीबाबत सर्व राजकीय पक्षांनी समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांना मतदानासाठी देण्यात येणार्या मतदार स्लिपवाटपाचे काम २४० मतदारसंघांत सुरू करण्यात आले असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी वाहनांवर राजकीय जाहिरातींना बंदी घालण्यात आल्याचे संपथ यांनी सांगितले. त्यामुळे बेस्ट, एसटी, रेल्वे, तसेच पालिकांच्या बससेवा यावर आता जाहिराती करता येणार नाहीत असे त्यांनी सांगितले.
२८ लाख मतदार वाढले
राज्यात एकूण ८ कोटी ३३ लाख मतदार असून त्यामध्ये ४ कोटी ४० लाख पुरुष मतदार तर ३ कोटी ९३ लाख महिला मतदार असून १३९१ तृतीयपंथी मतदार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने केलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमामुळे राज्यात २८ लाख ४९ हजार मतदार वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात एकूण ९१४७ मतदान केंद्रे असून त्यातील ३९०० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. मतदारांना सुरक्षित आणि निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी पोलीस महासंचालक, मुख्य सचिव, वरिष्ठ सरकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांची बैठक घेण्यात आली असून आचारसंहितेचे कडेकोट पालन करण्याबाबत संबंधितांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्याचे संपथ यांनी सांगितले.