मुंबई - मुकेश श्रीकृष्ण धावडे
मुंबई महानगर पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय आणि तेथे सेवेत असलेले कर्मचारी मृत्यु शय्येवर पडू लागले आहेत. प्रशासनाच्या या अनास्थेमुळे गेल्या पाच वर्षात रुग्णालयात क्षय रोगाचा संसर्ग झालेल्या ६० पैकी ३५ कर्मचार्यांना प्राणास मुकावे लागले आहे . त्याशिवाय वैधकिय सेवा आणि प्रशासकीय कर्मचार्यांची संख्या अपुरी असल्यामुळे रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. एकंदर परिस्थिती कोलमडल्यामुळे या रुग्णालयातील कर्मचार्यांना क्षयरोग रुग्णांमुळे संसर्गजन्य होत असून कर्मचार्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. असा आरोपही कर्मचार्यांच्या वतीने करण्यात येत आहे
शिवडी येथील महापालिकेच्या क्षयरोग रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना क्षयाची बाधा होऊन मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. प्रशासन कर्मचाऱ्यांबाबत पूर्णपणे बेपर्वा असल्याचा कामगार संघटनांचा आरोप आहे.पालिकेच्या क्षयरोग रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेशा संरक्षक उपायांअभावी क्षयरोगाची लागण होते. नुकताच येथील एक्स-रे टेक्निशिअन रमेश जाधव (56) यांचा मृत्यू ओढवला. रुग्णांच्या छातीचे एक्स-रे काढण्याचे काम करणाऱ्या जाधव यांना सतत रुग्णांच्या संपर्कात आल्याने टीबीची लागण झाल्याचा संशय होता. गेल्या वर्षी त्यांना टीबी झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी (2014) चालू वर्षांच्या 9 महिन्यांत जाधव यांच्या शिवाय कक्ष परिचर-अशोक कांबळे, कक्ष परिचर- रवींद्र सोनवणे हे वॉर्डबॉय आणि स्वीपर- अशोक सोळंकी असे 4 कर्मचारी मरण पावले आहेत. टीबीग्रस्त झालेल्यांपैकी सगळ्यात जास्त 27 चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून, 8 परिचारिका, 1 डॉक्टर व 1 लिपिक यांचाही त्यात समावेश आहे. यामुळे कर्मऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
कामगारांसाठी संरक्षक उपायांची काळजी घेण्यात येत नसल्याचा आरोप म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रदीप नारकर यांनी केला. क्षयरोग रुग्णालयातील समस्यांबाबत आम्ही अनेक आंदोलने केली, परंतु प्रशासन निष्क्रियच राहिले. काही दिवसांपूर्वी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केईएमसह अनेक रुग्णालयांना भेट दिली. परंतु टीबी हॉस्पिटलमध्ये मात्र संसर्गाच्या भीतीमुळे ते न फिरता कार्यालयातच बसून राहिले. क्षयाची लागण झाल्यामुळे 37 कर्मचारी रजेवर आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांना दिला जातो तसा 'रिस्क अलाऊन्स' येथील कामगारांनाही देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
रुग्णांच्या संपर्कात राहून कर्मचारी क्षयाने मरण पावत असले, तरी महापालिकेचे प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा कामगार संघटनांचा आरोप आहे. अनेकांचा मृत्यू ओढवूनही प्रशासनाला जाग येत नाही. रुग्णालयाचा परिसर अतिशय अस्वच्छ असल्यामुळे रुग्ण बरे होत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याकरता आठ दिवसांत बैठक बोलावण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मा केसकर यांनी दिले होते, पण महिना उलटूनही ही बैठक झालेली नाही. टीबीची लागण होत असल्यामुळे कर्मचारी येथे यायला तयार होत नाहीत, असे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रदीप नारकर यांनी सांगितले.