महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका यावेळी थोड्या वेगळ्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे एकीकडे शिवसेना आणि भाजपाची २५ वर्षे जुनी युती तुटली आहे तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची १५ वर्षे असलेली आघाडीही तुटली आहे. यामुळे एकमेकांच्या विरोधात सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता निवडणूक म्हटला कि प्रचारही आला. पण याच प्रचाराच्या नावाने महाराष्ट्राची मात्र बदनामी सुरु करण्यात आली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पदावर बसवण्यात सोशल मिडिया आणि इलेक्ट्रोनिक मिडीयाचा मोठा हात आहे. याच सोशल मिडिया आणि इलेक्ट्रोनिक मिडिया वरून सध्या एक जाहिरात सुरु आहे "कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा". या जाहिराती मधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारवर आरोप करण्यात आले आहे. हे आरोप करताना सरकारने काय केल नाही असे या जाहिराती मधून दाखवण्यात आले आहे. या जाहिराती मध्ये सरकारवर आरोप करणे इतपत ठीक आहे. पण महाराष्ट्राला मागे नेवून ठेवल हे म्हणणे कोणत्याही राज्यातील जनतेला मान्य नाही.
भारतीय जनता पार्टीने जसे या जाहिराती मध्ये म्हटले आहे कि महाराष्ट्राला मागे नेवून ठेवले आहे. चला काही वेळा साठी हे मान्य करायचे म्हटले तरी मग भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक नोकऱ्या शोधायला मुंबई आणि महाराष्ट्रात का येतात ? हे नोकऱ्या शोधणारे भाजपावाल्यांनी विकास केलेल्या गुजरात मध्ये का जात नाहीत ? तिकडे इतका खरोखरच विकास झाला असेल मग नोकऱ्या शोधणारे लोक गुजरातकडे पाठ फिरवून ज्या महाराष्ट्राचा विकासच झाला नाही तिकडे का येतात? असे कीतेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
गुजरात मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. अश्या भाजपच्या मुख्यमंत्री नुकत्याच मुंबई मध्ये आल्या होत्या. मुंबई आणि महाराष्ट्रामधील उद्योगपतींच्या एका कार्यक्रमात त्यांनी उद्योगपतींना गुजरात मध्ये येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला कोणीही साधी भिक सुद्धा घातली नाही. उलट उद्योगपतींच्या संघटनेने प्रसिद्धी पत्रक काढून आम्ही काहीही झाले तरी गुजरात मध्ये जाणार नाही असे या मुख्यमंत्री बाईना ठणकावून सांगितले आहे. आता विचार करा राजकारणी विकास झाला नाही असे म्हणत असले तरी उद्योगपती मात्र महाराष्ट्राला आपले मानत आहेत.
गुजरातचा किती विकास झाला हे ढोल वाजवून सांगितले तरी गुजरातच्या विकासाला लोक भुलत नसल्याचे दिसत आहेत. गुजरातचा विकास झाला असला तर तो हल्लीच्या काळात होत आहे. परंतू गुजरातच्या आधी महाराष्ट्राचा विकास कित्तेक पटीने झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये उद्योग धंद्यांना चांगल्या पोषक अश्या सुविधा मिळत आहेत. लोकांना सरकारी नोकऱ्या मिळत नसल्या तरी खाजगी नोकऱ्या मिळत आहेत. हे सत्य असल्यानेच उद्योगपती म्हणा किंवा बेरोजगारा म्हणा ते महाराष्ट्राकडे येत आहेत.
आता निवडणूक तोंडावर आल्याने सरकारकडून विकासच झाला नाही असा आरोप केला जात आहे. आता निवडणूक घोषित झाल्यावर भाजपा वाल्यांना विकास झाला नाही याचा साक्षात्कार झाला आहे. सरकार मधील पक्षाने महाराष्टाचा विकास केला नाही मग विरोधी पक्षामध्ये तुम्ही होताच ना ? त्यावेळी तुम्ही का हे लोकांच्या निदर्शनास आणून दिले नाही. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजपावाल्यांनी याचा जाब का विचारला नाही असे प्रश्न पुन्हा निर्माण होत आहेत.
आताच निवडणुका आल्यावर भाजपावाल्यांनी महाराष्ट्राचा विकास झाला नसल्याचा जो प्रचार सुरु केला आहे. या प्रचारामुळे आणि महाराष्ट्राचा जो अवमान या जाहिराती मधून चालवला आहे यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जाहिराती मधून दाखवले जाणारे सत्य नसल्याचे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. भाजपावाले खालच्या थराला जाऊन प्रचार करत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. भाजपावाल्यांना काहीही करून महाराष्ट्रामध्ये आपले सरकार आणायचे असल्याने कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे.
आपले सरकार यावे लोकांनी आपल्याला निवडून द्यावे यासाठी ज्या जाहिराती दाखवल्या जात आहेत त्यामधून खुलेआम महाराष्ट्राचा अवमान केला जात आहे. भाजपा वाल्यांना या राज्यावर सत्ता मिळवायची आहे म्हणून ते ठासून खोटे बोलून हि सत्ता मिळवू पाहत आहेत. त्यासाठी ते ज्या राज्य मध्ये राहत आहेत त्याचीच अवमानना करत आहेत. हेच जर एखाद्या अल्पसंख्याक समाजातील कोणी केले असते तर भाजपावाल्यांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून फासावर चढवण्याची मागणी केली असती.
भाजपावाल्यांना निवडणूक समोर दिसत असल्याने आपण काय चुका करत आहोत. आपल्या जाहिराती मुळे आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याची अवमानना होत आहे याचे जराही भान राहिलेले नाही. सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून खुलेआम महाराष्ट्राचा अवमान होत असल्याने याची दखल आता खुद्द महाराष्ट्रातील मतदारांनीच घ्यायला हवी. जाहिराती मधून महाराष्ट्राचा अवमान केला जात असल्याने अश्या जाहिराती बंद करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करायला हवी तसेच गुन्हे दाखल व्हायला हवेत. तसेच महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या भाजपावाल्यांना येत्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील मतदाराने पार पाडायलाच हवी.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment