महराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज रविवारी जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या निकालानुसार महाराष्ट्रातील जनतेने राज्यात गेले १५ वर्षे असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या विरोधात मतदान केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या विरोधात मतदान करताना जनतेने कुठल्याही पक्षाला बहुमत दिले नसल्याने महाराष्ट्र मध्ये सध्या त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
२००९ मध्ये काँग्रेसच्या ८२, राष्ट्रवादीच्या ६२, भाजपाच्या ४६, शिवसेनेच्या ४५, मनसेच्या १३, तर अपक्ष व इतर पक्षांच्या ४१ जागा निवडून आल्या होत्या. हा लेख लिही पर्यंत २०१४ चा निकालाप्रमाणे भाजपा १२१, शिवसेना ५९, काँग्रेस ४३, राष्ट्रवादी ४३, मनसे १, तर इतर व अपक्ष २३ जागांवर आघाडीवर आहेत. या निकालावरून महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही एका पक्षाला एक हाती सत्ता दिलेली नाही.
महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या कौला नुसार भाजपाला झुकते माप दिले असले तरी स्पष्ट बहुमत दिलेले नाही. या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा धुव्वा उडवताना जनतेने भाजपला कुणाची तरी साथ घेवूनच सत्ता स्थापन करावी लागेल असा निकाल दिला आहे. या निकालामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी बैठकांचा जोर सुरु झाला आहे. १४५ चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपाला कोणत्याही एका पक्षाची किंवा अपक्षांची साथ घ्यावी लागणार आहे.
सेना भाजपची युती तुटल्यावर सेनेने भाजपावर गंभीर टीका केली आहे. हि टीका भाजपाच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. या टीकेमुळे भाजपाने सेनेबरोबर कधीही युती शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतू निवडणुकीच्या शेवटच्या काही दिवसात सेना भाजपाबाबत चांगलीच मवाळ झाली आहे. सेनेला काही करून मुख्यमंत्री पद हवे आहे. तशी मागणी सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दुरचित्रवाहिन्यांकडे केली आहे.
पारंपारिक मित्र असलेल्या सेने बरोबर युती तुटावी असे आम्हाला वाटत नव्हते, सरकार स्थापनेचे सर्व पर्याय खुले असल्याचे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. यावरून सेना भाजपा युती होण्याची शक्यता आहे. परंतू मग एकमेकांवर केलेल्या आरोपांचे काय ? मतदारांनी भाजपा आणि सेने मध्ये स्पर्धा निर्माण केली होती. आता पुन्हा सेना भाजपा एकत्र आल्यास हा मतदारांनी दिलेल्या कौलाचा अपमानच होईल. याचा विचार सेना भाजपाच्या नेत्यांनी करण्याची गरज आहे. मतदारांनी दिलेल्या कौलाचा आदर दोन्ही पक्षांनी राखायला हवा.
भाजपाची सेने बरोबर युती न झाल्यास भाजपाच्या नेत्यांनी ज्या राष्ट्रवादीचे भ्रष्टाचार बाहेर काढले त्यांच्या सोबतच युती करण्याची नामुष्की भाजपावर येणार आहे. अशी युती करताना राष्ट्रवादीचे सर्व भ्रष्टाचार भाजपावाल्यांना दाबून टाकावे लागणार आहेत. भाजपाने काढलेल्या सर्व भ्रष्टाचारातून सत्तेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना क्लीन चिट द्यावी लागणार आहे. भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी सध्या तरी सेना आणि राष्ट्रवादी हे दोनच पर्याय समोर आहेत.
दोन्ही पर्यायाचा विचार करता एकीकडे सेनेला मुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादीला भ्रष्टाचारातून क्लीन चिट देणे भाजपाला परवडणारे नाही. सेना आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा भाजपचा लहान भाऊ होण्यास तयार होणार नाहीत. यामुळे महाराष्ट्रात सध्या सुरु असलेली राष्ट्रपती राजवट यापुढेही लागू राहील. आणि पुन्हा निवडणुका घेण्याची गरज भासू शकते. येणाऱ्या दिवसात भाजपा कोणती भूमिका घेते कोणाचा पाठींबा घेते यावर आता महाराष्ट्राचे राजकारण अवलंबून आहे.
स्थिर सरकार देण्याचे भाजपाने स्पष्ट केले असले तरी मतदारांनी तसे भाजपला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. यामुळे स्थिर सरकार देण्याचे भाजपाचे स्वप्न भंगले आहे. राजकारणात कायमस्वरूपी कोणीही शत्रू नसल्याने येणाऱ्या दिवसात भाजपा शिवसेनेचा कि राष्ट्रवादीचा पाठींबा घेते हे स्पष्ट होईल. सेना किंवा राष्ट्रवादीचा पाठींबा घेवून भाजपाला नवे सरकार स्थापन करावे लागणार आहे. या समीकरणा व्यतिरिक्त भाजपाला एका बाजूला ठेवून शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष व अपक्षांचा पाठींबा घेवून सरकार स्थापन करू शकतात. कोणत्याही प्रकारे सत्ता स्थापन झाल्यास भाजपाची मात्र गोची होणार आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment