पालिकेतील पाच नगरसेवक आमदार झाले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2014

पालिकेतील पाच नगरसेवक आमदार झाले

विधानसभा निवडणुकीत मुंबई महापालिकेतील २७ पैकी पाच नगरसेवकांना आमदार बनण्याचा मान मिळाला असून त्यापैकी भाजपाचे तीन आणि शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. माजी महापौर सुनील प्रभू (शिवसेना) यांनी दिंडोशी मतदारसंघातून विद्यमान आमदार राजहंस सिंग (काँग्रेस) यांना धूळ चारली तर दहिसर मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर उभ्या असलेल्या शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ व आमदार विनोद घोसाळकर यांचा भाजपाच्या मनीषा चौधरी यांनी पराभव केला आहे. 

शिवसेनेचे नगरसेवक अशोक पाटील यांनी भांडुप मतदारसंघातून मनसेचे आमदार शिशिर शिंदे यांना 'चितपट' केले. शीव मतदारसंघातून भाजपाचे नगरसेवक तमिळ सेल्वन यांनी विजय मिळवला आहे. अंधेरी पश्‍चिम मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अशोक जाधव यांना भाजपाचे नगरसेवक अमित साटम यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची महायुती व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी फुटल्यामुळे, जे नगरसेवक इच्छुक होते, त्यांनादेखील आमदारकीची स्वप्ने पडली आणि त्यांनी आयत्या वेळी अर्ज भरले. त्यांच्यापैकी बर्‍याच जणांना निकालाआधीच आमदारकीचे स्वप्न दिसत होते. परंतू निकाला नंतर हे स्वप्न धुळीस मिळाले आहे. पराभूत नगरसेवकांमध्येही भाजपा 'आघाडी'वर आहे. भाजपाचे पाच, काँग्रेसचे आणि मनसेचे प्रत्येकी चार, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन, दोन अपक्ष आणि अभासेच्या गीता गवळी यांचा समावेश आहे. 

Post Bottom Ad