मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरपीआय नेते रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टीकेला राखी सावंतने प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्या नावापुढील ठाकरे हे नाव काढल्यास राज शून्य आहेत, राज ठाकरेंना मिमिक्री करण्याची हौस असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येवून लोकांचे मनोरंजन करावे अशी टीका रिपाइ महिला आघाडीच्या राखी सावंत यांनी केली आहे.
मुंबईतील सभेत राज ठाकरेंनी रामदास आठवलेंना उपमुख्यमंत्री पद देण्याच्या भाजपच्या निर्णयाची खिल्ली उडवली होती. याबाबत बोलताना राज ठाकरेंनी वडिलांच्या वयासमान असणाऱ्या रामदास आठवलेंचा अपमान केला आहे. आठवलेंचा अपमान म्हणजे संपूर्ण दलित समाजाचा अपमान आहे. मराठीच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या माणसे आणि शिवसेनेच्या नेत्यांना भाजप - आरपीआय महायुती झोंबल्यानेच राज ठाकरेंनी आठवलेंवर टीका केली असे राखी सावंतने म्हटले आहे. दलितांनी पुढे जाऊ नये असे ठाकरे बंधूना वाटत असल्याने रिपाइ मध्ये फुट पाडण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोप करत असे कारस्थान त्वरित थांबवावे असे आवाहन सावंत यांनी केले.
रिपाइला आता पर्यंत कमजोर समजून फुटबॉल प्रमाणे वागवले जात होते मात्र यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा सज्जड दम देत रिपाइला नक्कीच चांगले दिवस येतील असा विश्वास सावंत व्यक्त केला. यावेळी दुष्काळग्रस्तांची चेष्टा करणा-या अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला जनताच त्यांची जागा दाखवून देईल असे विधानही राखी सावंत यांनी केले आहे. आरपीआय- भाजप युती असल्याने भाजपाचाही प्रचार करणार असल्याचे राखीने स्पष्ट केले.