महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांच्या अडवणुकीमुळे आणि पालिकेच्या शिक्षण अधिकारी व अन्य अधिकारी आणि काही शिक्षकांच्या असहकारामुळे तसेच काम न करण्यासाठी 'रडगाणे' गायल्याने शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांच्या हिताचे काही प्रकल्पांचे काम सुरू झालेले नाही, असा आरोप महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
आदर्श शाळा योजना, पालिकेच्या शाळांमध्ये व्हच्यरुअल शाळा उपक्रम, विविध कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये राबवण्यात येणारे 'क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया' शाळा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे आदी उपक्रम पालिकेच्या शाळांमध्ये राबवण्याचे मी प्रयत्न सुरू केले. पण त्याला अडताणी आणि शिक्षण अधिकारी व अन्य अधिकार्यांनी विरोध केला. यामुळे मी अडताणी, अन्य अधिकारी, शिक्षकांची तक्रार पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी तात्काळ अतिरिक्त आयुक्त विकास खरगे यांना यात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत, असे शेलार यांनी पत्रकारांना सांगितले.
अडताणी पालिकेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याविरोधात का तक्रार केलीत, ते अतिरिक्त आयुक्त पदावर असताना त्यांना याबद्दल शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून का जाब विचारला नाहीत किंवा आयुक्तांच्या का निदर्शनास आणले नाहीत, असा सवाल शेलार यांना केला असता ते म्हणाले, मला या पदावर येऊन तीन-चार महिनेच झाले. त्यामुळे या योजना तयार करून त्या समजून घेण्यास काही अवधी गेला आणि योजनांची पूर्वतयारी सुरू केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम थांबले व आचारसंहिता सुरू असतानाच अडताणी पालिका सेवेतून नवृत्त झाले. त्यामुळे मी काहीच करू शकलो नाही व अडताणी यांच्या नावातच 'अडवणूकपणा' होता, अशी टीका शेलार यांनी केली.