पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे अंत्यसंस्कारांना मनाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2014

पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे अंत्यसंस्कारांना मनाई

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्यामुळे चक्क अंत्यसंस्कार करण्यास मनाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपरमध्ये उघडकीस आला आहे. सुरक्षेची बाब म्हणून पोलिसांनी स्मशानभूमीच्या परिसराचा ताबा घेतला आहे. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांत असंतोष आहे. लोकांच्या भावनेशी हा खेळ असल्याने ही सभा रद्द करावी, अशी मागणी मुख्य निवडणूक आयोगाकडे घाटकोपर पूर्व मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार प्रवीण छेडा यांनी केली आहे. 
घाटकोपर पश्‍चिमेस असलेल्या राजावाडी येथील सोमय्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची गुरुवारी (ता. 9) प्रचारसभा होणार आहे. या मैदानालगत हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीची भिंत मोदी यांच्या आगमनासाठी, व्हीआयपींच्या प्रवेशासाठी तसेच सुरक्षेच्या उपाययोजनेसाठी तीन ठिकाणी सोमवारी रात्री कुणालाही थांगपत्ता लागू न देता तोडण्यात आली. या सभेसाठी तब्बल दोन दिवस स्मशानात अंत्यविधी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आवश्‍यकता भासल्यास मृतदेहांचे स्कॅनिंग करणार असल्याचेही समजते. हा परिसर शांतता क्षेत्रात असल्याने या मैदानात सभेला परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे छेडा यांनी केली आहे.

अंत्यसंस्कारांना मनाई करणे हा गंभीर प्रकार असून, स्मशानभूमीचा ताबा घेऊन पोलिसांनी प्रवेशबंदी केल्यामुळे स्थानिकांत असंतोष निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या नावाखाली हिंदू धर्मीयांच्या भावनांशी हा खेळ चालू आहे. या प्रकारास आळा घालावा आणि ही सभा रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी आयोगाकडे केली आहे.

Post Bottom Ad