मुंबई – मागील काही दिवसांपासून तोतय पोलिसांनी मुंबईत धुमाकूळ घातला आहे. हे तोतया पोलिस मानसिकदृष्टय़ा कमजोर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना एकटे गाठून त्यांची फसवणूक करत आहेत. अनेकदा पोलिस विना वर्दीत फिरत असल्याचा फायदा या तोतयांना होत आहे.
पोलिस विभागात पोलिसांना गणवेश सक्तीचा असतो. मात्र काही विशेष पोलिसांना गणवेश घालण्याची गरज नसते. पोलिस विभागात गोपनीय शाखेत काम करणारे, गुन्हे शाखेत काम करणारे पोलिस, विशेष शाखेचे कर्मचारी अशा काही विभागांच्या कर्मचाऱ्यांना गणवेश न घालण्याची मुभा दिलेली असते. नेमका याच गोष्टीचा फायदा तोतया घेत असल्याचे समोर आले आहे. हे तोतया ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना पोलिस असल्याचे सांगून लुबाडत आहेत. वारंवार घडणा-या या घटनांमुळे आणि नियमांचे पालन पोलिसांनी करावे, यासाठी विलपार्ले पोलिस ठाण्याबाहेरील सूचना फलकावर पोलिसांना खाकी गणवेश सक्तीचा असल्याच्या सूचना लिहिण्यात आली आहे.