'राम मंदिराची उभारणी हा भाजपच्या अजेंड्यावरील महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारकडे २०१९पर्यंत वेळ आहे. त्यासाठी घाई करण्याची गरज नसून आम्ही सरकारवर कोणताही दबाव टाकणार नाही,' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केले आहे.
संघाच्या अखिल भारतीय कृती समितीच्या तीन दिवसीय बैठकील शुक्रवारी लखनऊ येथे सुरुवात झाली. यावेळी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रात भाजपचे बहुमत आल्यामुळे अयोध्येत राम मंदिर उभारणीला गती येईल, असे बोलले जात होते. त्या अनुषंगाने बोलताना होसबळे यांनी राम मंदिराबाबत संघाची भूमिका स्पष्ट केली.
'राम मंदिर हा देशाचाच अजेंडा आहे. त्यासाठी आजवर झालेल्या आंदोलनांना संघाने कायमच पाठिंबा दिला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातही राम मंदिर उभारणीचा उल्लेख आहे. मात्र, त्यासाठी सरकारकडे २०१९पर्यंत वेळ आहे. सरकारचे स्वत:चे काही प्राधान्यक्रम आहेत. सरकारला आधी सामान्य माणसाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे आम्ही आताच सरकारकडे मंदिराबाबत काहीही मागणी करणार नाही,' असेही होसबळे म्हणाले.