जवखेडे हत्याकांडातील तीनही मृतदेहांवर अंत्यसंस्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2014

जवखेडे हत्याकांडातील तीनही मृतदेहांवर अंत्यसंस्कार


पार्थडी : जवखेडे येथील दलित समाजाच्या तिहेरी हत्याकांडातील तीनही मृतदेहांवर गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपींचा शोध लागल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतल्याने प्रशासन व ग्रामस्थांमध्ये तणाव निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि पोलीसप्रमुख लखमी गौतम यांनी ग्रामस्थांची समजूत काढून आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

जवखेडे येथील ग्रामस्थांनी आरोपींचा शोध लागला पाहिजे व त्यांना कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम हे गेले तीन दिवस जवखेडे येथे तळ ठोकून आहेत, तीन दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता येत नसल्याबद्दल जवखेडे ग्रामस्थ व विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरोपींना अटक करेपर्यंत अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका मयताच्या नातेवाईकांनी घेतली होती. मात्र आरोपींना लवकरच अटक करू, असे आश्‍वासन पोलीस अधिकार्‍यांनी दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाधिकारी अनिल कवडे व जिल्हा पोलीसप्रमुख लखमी गौतम यांनी ग्रामस्थ व दलित चळवळीतील नेत्यांबरोबर चर्चा केली. जवखेडे गावाला भेट दिली. घटनेची माहिती घेतली व जाधव कुटुंबाचे सांत्वन केले.

जवखेडे येथील दलित हत्याकांडातील आरोपींना घटनेनंतर तीन दिवस उलटूनही अटक झालेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे. पोलिसांची अकार्यक्षमता यावरून दिसते. दलितांवर अन्यायाच्या घटना अहमदनगर जिल्ह्यात जास्त प्रमाणात का घडतात, याचा शोध घेतला जावा, दलितांवर अन्याय व अत्याचार होऊ नयेत, यासाठी काय काळजी घेतली गेली हे महत्त्वाचे आहे. आता आमचा संयम संपत चालला आहे. तातडीने आरोपींना अटक करा अन्यथा दलित संघटना रस्त्यावर उतरतील, असा इशारा माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी गुरुवारी जवखेडे येथे बोलताना दिला.

Post Bottom Ad