महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांची चौकशी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2014

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांची चौकशी होणार

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची चौकशी होणार आहे. केंद्रीय गृहखात्याने या चौकशीला परवानगी दिली आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) खात्याने भुजबळ यांची खुली चौकशी करण्यास काहीच हरकत नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सदन व मुंबईतील दोन सरकारी इमारतींच्या बांधकामात भुजबळ यांची नेमकी भूमिका काय होती, हे तपासले जाणार आहे. त्यामुळे भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

'महाराष्ट्र सदन'च्या कंत्राटापोटी मेसर्स चमणकर एंटरप्रायझेसला मिळालेल्या शंभर कोटी रुपयांपैकी काही रक्कम ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड व इदीन फर्निचर या दोन कंपन्यांना देण्यात आली होती. या दोन कंपन्यांवर भुजबळ व त्यांच्या नातेवाईकांचे नियंत्रण असल्याचा दावा असल्याचा आरोप आहे. १२ फेब्रुवारी, २०१० ते २० जानेवारी, २०१२ या कालावधीत ७४.१० लाख रुपये इदीन फर्निचर यांना देण्यात आले होते. त्या कंपनीचे संचालक पंकज भुजबळ यांची पत्नी विशाखा भुजबळ व समीर भुजबळ यांची पत्नी शेफाली भुजबळ आहेत. तसेच ७ डिसेंबर, २००७ आणि ९ मे, २०११ रोजी ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरला ३६.७७ लाख रुपये देण्यात आले होते. ही कंपनी भुजबळ यांच्या नियंत्रणाखाली असून त्याचा एक कर्मचारी संजय जोशी हा संचालक आहे व भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टचा तो कर्मचारी असल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने याआधी भुजबळ यांच्याकडून स्पष्टीकरणही मागवले होते.

Post Bottom Ad