मुंबई : महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी ठाणे जिल्ह्यातील पांजरापूर येथील जल शुद्धी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचे घणाघाती आरोप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही केली.
पांजरापूर येथे ३० कोटी रुपयांचा ओझोन जलशुद्धी प्रकल्पाला पालिकेने २०११ मध्ये हिरवा कंदील दिला . या प्रकल्पातून जलशुद्धीकरण करून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सध्या हा प्रकल्प ६५ कोटींचा झाला आहे. अजूनही या प्रकल्पाची किम्मत वाढण्याची दाट शक्यता आहे. या प्रकल्पासाठी प्रतिभा इंडस्ट्रीला कंत्राट दिले आहे. तर सल्लागार म्हणून सन एन्व्हायरो टेक़्नोलोजिस या कंपनीला सल्लागार म्हणून नेमलेले आहे.
परंतु पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी जर्मनीच्या कंपनी बरोबर साटेलोटे करून भारतात कमी किमतीत मिळणारे ट्रान्स्फर पंप जास्त किमतीला खरेदी केले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचे आंबेरकर यावेळी म्हणाले. भारतात या पंपांची किम्मत ५० हजार रुपये आहे. त्याच पंपाची किम्मत जर्मनीत ५ लाख आहे. पालिकेने १ ते दीड करोड रुपयांचे ट्रान्स्फर पंप ५ ते ६ करोडला विकत घेतले असून या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी केली. यावर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.