मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहिता भंगाची ३३ प्रकरणे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2014

मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहिता भंगाची ३३ प्रकरणे

मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहिता भंगाची एकूण ३३ प्रकरणे दिसून आली असून त्याबाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी २३ प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. एकूण १२ उमेदवारांच्या बातम्या पेडन्यूज असल्याचा निर्णय एमसीएमसी कमिटीने घेतला आहे. 

मुंबई उपनगर जिल्हयातील २६ विधानसभा मतदारसंघातील मतदान येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यासाठी प्रशासनाने परिपूर्ण व्यवस्था केली आहे. या मतदारसंघात एकूण ३८० उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ७७ लाख ४३ हजार ८३९ मतदार आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण ७३४६ मतदान केंद्र असून १५ पेक्षा जास्त उमेदवार असणाऱ्या मतदान संघात अतिरिक्त बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत. भांडुप (पश्चिम), घाटकोपर (पश्चिम), मानखुर्द शिवाजीनगर, कुर्ला (अ.जा.), कलिना, वांद्रे (पूर्व), दिंडोशी, गोरेगाव या ठिकाणी डबल बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यात ७८ भरारी पथके, ७८ स्टॅटिस सर्व्हिसेस टीम, ५१ व्हिडिओ रेकॉर्डिंग व ३५ व्हिडिओ व्हिविंग पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

याशिवाय भिंती विद्रुपीकरणाची एकूण १०२०, पोस्टर्सची ७२१, बॅनर्सची १५१६ आणि अन्य १४२४ अशा एकूण ४६८१ प्रकरणांची नोंद घेण्यात आली आहे. सर्व विद्रुपीकरण काढून टाकण्यात आले आहे.

मतदारसंघात बेकायदेशीर सभा / भाषणे आदीची ४ प्रकरणे असून त्या सर्व प्रकरणात एफ.आय.आर.दाखल करण्यात आला आहे. यात जोगेश्वरी, दिंडोशी, मालाड पश्चिम व वर्सोवा या विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश आहे.

आतापर्यंत एकूण २ कोटी ५८ लाख ८५ हजार ८५० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत एकूण ४९ लाख ९३ हजार ७२९ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. एकूण ४३२ प्रकरणांत ४०७ लोकांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय १५ वाहने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे.

Post Bottom Ad