गुजरातपेक्षाही चांगली शहरे आम्ही विकसित केली आहेत - अजित पवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2014

गुजरातपेक्षाही चांगली शहरे आम्ही विकसित केली आहेत - अजित पवार

वाघोली : "नरेंद्र मोदी यांना भारतीयांच्या जिवापेक्षा महाराष्ट्राच्या सत्तेत अधिक स्वारस्य आहे. यामुळेच ते सीमेवरील परिस्थिती हाताळण्याऐवजी राज्यात सभा घेत सुटले आहेत,‘ असा आरोप करून, "हेच का चांगले दिवस,‘ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. "लोकसभा निवडणुकीच्या आधी चांगल्या दिवसाची भाषा करणारे मोदी आता परदेश दौऱ्यातच गुंतले आहेत. गुजरात- गुजरात करू नका. अहो गुजरातपेक्षाही चांगली शहरे आम्ही विकसित केली आहेत,‘‘ असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. 

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. अशोक पवार यांच्या प्रचारार्थ वाघोलीतील सभेत पवार बोलत होते. या प्रसंगी वडगावशेरीचे उमेदवार बापू पठारे, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परीषद सदस्य अर्चना कटके, पंचायत समितीच्या सभापती वसुंधरा उबाळे, प्रकाश म्हस्के उपस्थित होते. 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफ डागताना पवार म्हणाले, ""व्यापाऱ्यांच्या एलबीटीबाबत निर्णय घ्या, असे मी त्यांना वारंवार सांगितले; मात्र त्यांनी मनमानी केली. जनतेच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेण्याच्या आमच्या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांना राज्याचे हित कळत नाही. राज्याचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच साथ द्या,‘‘ असे आवाहन त्यांनी केले.

Post Bottom Ad