सुमारे २४ वर्षांपूर्वी, १९९० मध्ये निवडणुकीच्याच दिवशी, बोगस मतदानाला विरोध करणाऱ्या घनश्याम भतीजा यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप पप्पू कलानीवर होता. घनश्याम यांचा भाऊ इंदर भतीजा या या हत्या प्रकरणातील साक्षीदार होता. त्यानंच या हत्येची तक्रार पोलिसात नोंदवली होती आणि पप्पू कलानीपासून जिवाला धोका असल्यानं पोलीस संरक्षणही घेतलं होतं. परंतु, दुसऱ्याच दिवशी, २८ एप्रिल १९९० रोजी कामावर निघालेल्या इंदरचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
घनश्याम भतीजा हत्येचा खटला हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला. पण सुप्रीम कोर्टाने त्या प्रकरणात स्टे ऑर्डर दिली. कलानीवर टाडाअंतर्गत गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मात्र, टाडा आरोपातून नंतर कलानी मुक्तही झाला. त्यावेळी, इंदर भतीजा हत्याप्रकरण सेशन्स कोर्टात चालवण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, गेल्या वर्षी ३ डिसेंबरला कलानी आणि त्याच्या चार साथीदारांना कल्याण सेशन्स कोर्टानं जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात पप्पू कलानीनं मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, सेशन्स कोर्टाचाच निकाल कायम ठेवून हायकोर्टानंही त्याला दणका दिला आहे.