नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या चोख बंदोबस्तानंतरही विविध मतदारसंघांत नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी पैशांचा आणि मद्याचा पाऊस सुरूच असल्याचे वृत्त येत आहेत. निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्यात विविध ठिकाणी झालेल्या कारवायांमध्ये आतापर्यंत १४ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड आणि ७५ लाखांची दारू जप्त करण्यात आली.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ताजा आकडेवारीनुसार, आयोगाने नेमलेल्या पथकातील अधिकार्यांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत १४,५२,३७,८७६ रुपये जप्त करण्यात आले आहेत, तर मतदारांची दिशाभूल करण्यासाठी विविध मतदारसंघांत वाटप करण्यात आलेली ७५ लाख रुपये एवढय़ा किमतीची २.८ लाख लिटर दारूदेखील जप्त करण्यात अधिकार्यांना यश आले आहे. अधिकार्यांनी शेवटच्या कारवाईत एका उमेदवाराकडून ४.८ लाख रुपयांची रोकड जप्त केली. त्याचा उल्लेखही या आकडेवारीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने अबकारी कर विभाग, आयकर विभाग आणि वेगवेगळय़ा केंद्रीय विभागांमधील अधिकार्यांची निवड करून विशेष पथके तयार केली आहेत. १५ ऑक्टोबर रोजी होणार्या मतदानापूर्वी सर्व प्रकारचे व्यवहार टाळण्यासाठी हे पथक बारकाईने लक्ष ठेवून आहेत.