अहमदनगर जिह्याच्या पाथर्डी तालुक्यामध्ये जाधव कुटुंबियांचा वंशसंहार करुन 10 दिवसांपेक्षा अधिकचा कालखंड उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही. त्या निषेधार्थ रिपाइं एकतावादीच्या वतीने शनिवार दि. 1 नोव्हेंबर रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइं एकतावादीचे महासचिव उत्तमराव खडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडा या गावामध्ये संजय जाधव, सुनील जाधव आणि जयश्री जाधव या तिघांचा अत्यंत निघृणपणे खून करुन पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. हे तुकडे विहीर तसेच बोअरवेल मध्ये टाकण्यात आले. नेहमीप्रमाणे या हत्याकांडाला अनैतिक संबधाची जोड देऊन जाधव कुटुंबियांची मृत्युनंतरही अवहेलना सुरु आहे. आरोपी पकडण्याऐवजी पोलीस जाधव कुटुंबियांची बदनामी करीत आहेत, हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे.
जाधव कुटुंबांचा वंशसंहार करणाऱया आरोपींना तत्काळ अटक करावी, आरोपींना अटक केल्यानंतर या हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अहमदनगरला दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावे, या खटल्यासाठी निष्णात सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, या मागण्यांसाठी रिपाइं एकतवादीच्या वतीने शनिवार दि. 1 नोव्हेंबर 2014 रोजी रिपाइं एकतवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शना खाली राज्यभर आंदोलने करण्यात येणार आहेत. ठाणे जिह्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे, युवा नेते भय्यासाहेब इंदिसे, प्रल्हाद सोनावणे, ठाणे अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, भिवंडीचे नगरसेवक विकास निकम आदी नेते करणार असल्याची माहिती महासचिव उत्तमराव खडसे यांनी दिली.