उंदीर म्हणणाऱ्यांचा कोथळा काढला- उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 October 2014

उंदीर म्हणणाऱ्यांचा कोथळा काढला- उद्धव ठाकरे

मंचर- "दिल्लीकडे पाहून शेपूट हलविणाऱ्या मुख्यमंत्र्याला छत्रपती मान्यता देणार नाहीत. शिवरायांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून वाटचाल करणाऱ्या शिवसेनेचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी जनतेने आम्हाला संधी द्यावी. मिळालेल्या संधीचे सोने करू. 25 वर्षे भाजपची पालखी वाहिली आता भोई होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना उंदीर म्हणून शहेनशहा करत होते. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या वेळी त्यांना समजले की हा ढाण्या वाघ आहे,‘‘ असे सांगून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. 

मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ठाकरे बोलत होते. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संपर्कप्रमुख खासदार गजानन कीर्तिकर, कल्पना आढळराव पाटील, सुरेश भोर, शिवाजीराव ढोबळे, दिलीप घोडेकर, सुषमा गिरे, विजय पवार, लक्ष्मणराव काचोळे, बाळासाहेब वाघ, महेश ढमढेरे आदी उपस्थित होते. 

वाघ व उंदराची गोष्ट सांगून ठाकरे म्हणाले, ""मी जो "शेहेन‘ शहा उल्लेख करतोय; त्याचा अर्थ तुम्हाला समजतोय ना? मिर्झाराजे जयसिंग यांनी तह केला. त्या वेळी शिवाजी महाराज शहेनशहा यांच्या दरबारात गेले. महाराजांनी शहेनशहाला मुजरा केला नाही. "जिजाऊ मातेला, मावळ्यांना मुजरा करेल; पण शहेनशहा समोर झुकणार नाही,‘ अशी बाणेदार भूमिका छत्रपतींनी घेतली. त्याप्रमाणे शिवसेनेची या पुढील भूमिका असेल. छत्रपतींनी लोकसभा निवडणुकीत आशीर्वाद दिले. प्रथमच भाजपला राज्यात ऐतिहासिक यश शिवसेनेच्या मदतीमुळे मिळाले. त्याचा विसर त्यांना पडला आहे. विश्‍वासघात केल्यामुळे संताप येतो. कॉंगेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्य खणून लुटण्याचे व भाजपने विदर्भ वेगळा करून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे काम सुरू केले आहे. भाजपकडे चेहरा नाही, शिवाय ते दिल्लीकडे पाहून शेपूट हलवतील.‘‘ 

Post Bottom Ad