मुंबई - विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. सध्या निवडणुकीत रणधुमाळी सुरू आहेत. अशातच राज्यात एकूण ३१८ आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. यातील सर्वात जास्त ३९ तक्रारी या परभणी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. तर सर्वात कमी तक्रारी या सिंधुदुर्ग आणि ठाणे ग्रामीणमध्ये झाल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली आहे.
आचारसंहितेचा भंग कुठे होत आहे का, यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष आहे. ज्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत आहे त्या ठिकाणी तातडीने तक्रारी नोंदवून कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी बॅनर आणि झेंडे लावल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे. त्याच्याच जास्त तक्रारी आयोगाकडे आल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईमध्ये जवळपास १९ आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ९ तक्रारी या मुंबई शहरात तर १० तक्रारी या उपनगरात दाखल झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आचारसंहिता भंग, पेड न्यूज, पैसे वाटप रोखण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे चुकीच्या गोष्टींना आळा बसवण्यात निवडणूक आयोगाला सध्यातरी यश आले आहे. या पुढच्या काळात तर आणखीन कटाक्षाने निवडणूक आयोगाला काम करावे लागणार असल्याचे अधिका-यांनी या वेळी सांगितले. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिका-यांची या सर्वावर बारीक नजर आहे.