मुंबई : भाजपचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (शुक्रवारी) होणाऱ्या शपथविधीसाठी सुमारे साठ हजार निमंत्रितांना सामावून घेणाऱ्या आसन व्यवस्थेसह वानखेडे स्टेडियम सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात केवळ भाजपचे 8 ते 9 नेतेच मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे (गुरुवारी) स्पष्ट झाले. भाजपच्या या सरकारमधील शिवसेनेच्या सहभागाबाबत गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला जवळपास पूर्णविराम मिळाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव न आल्याने शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवून विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांनी घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याने भाजपचे सरकार उद्यापासून सत्तारूढ होत आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला आहे. मात्र 25 वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा सरकारमध्ये समावेश होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. या दृष्टीने आमची चर्चा सुरू असल्याचे शिवसेना व भाजप नेते दोन आठवड्यांपासून सांगत होते. शिवसेनेने अटी किंवा शर्तीशिवाय सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन भाजप नेते आवाहन करत असताना भाजपने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सरकारमध्ये सामील होण्याची तयारी शिवसेनेने दर्शविली होती. मात्र चर्चेचे गुऱ्हाळ रात्रीपर्यंत सुरूच होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल "मातोश्री‘वर बैठक झाली. या बैठकीत भाजपकडून अपमान होत असेल तर सरकारमध्ये सामील होण्यात काय अर्थ, असा सवाल अनेक नेत्यांनी केला. या बैठकीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलण्यावरही चर्चा झाली.
काल रात्री झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आज पुन्हा प्रमुख नेते व उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. मात्र भाजपकडून कोणताही प्रस्ताव न आल्याने आमदारांची बैठक बोलविण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे समजते. त्याबाबतच सूचनाही सर्व आमदारांना दिल्याचे सांगण्यात आले. निर्णयाचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना दिल्याने आमदारांची बैठक रद्द करण्यात आल्याचे शिवसेना नेत्यांनी आज स्पष्ट केले. दरम्यान, भाजपचे नेते राजीव प्रताप रूडी यांनी उद्या होणाऱ्या शपथविधीत शिवसेना सामील होणार नसल्याचे ‘ट्विट‘ आज केले. याचे तीव्र पडसाद शिवसेनेत उमटले. त्यामुळे उद्याच्या शपथविधीकडे पाठ करून विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांनी घेतल्याचे समजते.