निवडणुकीसाठी ४0 हजार पोलीस तैनात - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2014

demo-image

निवडणुकीसाठी ४0 हजार पोलीस तैनात

मुंबई : राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात अटीतटीच्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडणार असून या वेळी मुंबई आणि उपनगरांत निर्विघ्नपणे मतदान पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांचे ४0 हजार पोलीस रस्त्यावर उतरणार आहेत. ३६ मतदारसंघांत ९५ लाख ३0 हजार ९५७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून ९९२0 एकूण मतदान केंद्रे असून त्यापैकी १00३ अतिसंवेदशील आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवायांची मोहीम राबवली होती. 

युती आणि आघाडी तुटल्याने यंदाची विधानसभा निवडणूक पंचरंगी होत आहे. कधी नव्हे एवढी चुरस या निवडणुकीत असल्याने बुधवारी होणारे मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांचे ३५ हजार पोलीस कर्मचारी आणि साडेचार हजार पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. १३२५ होमगार्ड, केंद्रीय राखीव दलाच्या १७ कंपन्या, राज्य राखीव पोलीस बलाच्या १२ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

याशिवाय गुजरात, राजस्थान आणि बिहार येथून अतिरिक्त पोलीस बल मागवण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई पोलिसांनी १६,३३0 प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. ९३ जणांना तडीपार, ३४१५ अजामीनपात्र आणि ३,२१४ जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहेत. ७,५0८ जणांना समन्स बजावण्यात आले आहेत. विविध प्रकारचे ६0 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या काळात फरारी असलेल्या ७७ आरोपींना अटक करण्यात आली असून विविध गुन्ह्यांतील ११७ पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नाकाबंदी करून पोलिसांनी तब्बल १ लाख ७७ हजार वाहने तपासली त्यापैकी १0,८५0 वाहनांवर कारवाई करण्यात आली. शहरात १६७९ कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आली असून ७ हजार हॉटेल्स आणि ५ हजार लॉजेसची तपासणी करण्यात आली. विविध ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या मदतीने तब्बल १ कोटी ८७ लाख रुपयांची रोकड जप्त केली असून ५७ बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दारुबंदी कायद्याअंतर्गत १६३ गुन्हे नोंद करण्यात आले असून १६६ जणांना अटक करून २ कोटी ७ लाख ७२७.५0 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

Pages