मुंबई : महापौरपदाची आणि उपमहापौरपदाची स्वप्ने अनुक्रमे स्नेहल आंबेकर आणि अलका केरकर पाहत असल्या तरी शिवसेना-भाजपा महायुतीला आणि विरोधी पक्ष काँग्रेसला ११४ हा बहुमताचा आकडा पार पाडण्यासाठी अपक्षांच्या कुबड्या आवश्यक ठरणार आहेत. कारण महायुतीकडे व विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत नाही. महायुतीकडे सेनेचे ७५, भाजपाचे ३१ आणि रिपब्लिकन पक्षाचे १ असे १0७ नगरसेवक आहेत. तर विरोधी पक्षाकडेही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी व मनसे मिळून १0१ नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांना अपक्ष व छोट्या पक्षांची मदत घेणे अपरिहार्य ठरणार आहे.
२0१२ मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीच्या वेळी सुनील प्रभू यांना १२३ मते मिळाली होती. सध्या महापालिकेत २२७ नगरसेवक आणि पाच नामनिर्देशित सदस्य असे २३२ नगरसेवक आहेत, पण पाच नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. २२७ पैकी मनसेच्या प्रियंका श्रुंगारे यांचे नगरसेवकपद जात प्रमाणपत्र खोटे ठरल्याने रद्द झाले आहे. त्यामुळे आता फक्त २२६ नगरसेवक मतदानात भाग घेऊ शकतात. यामध्ये शिवसेनेचे ७५, सेनेला पाठिंबा देणारे नऊ अपक्ष, अखिल भारतीय सेनेचे दोन, भारिप बहुजन एक, रिपाइंचा एक अशी ८८ मते आहेत. भाजपाकडे ३१ मते व पाठिंबा देणारे एक अपक्ष अशी ३२ मते आहेत. त्यामुळे महायुतीकडे १२0 मतांचे संख्याबळ आहे.
तर काँग्रेसकडे ५२ मते, राष्ट्रवादीकडे १३ मते, मनसेची २७, समाजवादी पक्षाची नऊ, भारतीय शेकापचे एक, अपक्ष चार असे एकूण १0६ मतांचे संख्याबळ आहे. यामुळे महापौर आणि उपमहापौरपद मिळवण्यासाठी सत्ताधारी महायुतीला अपक्ष व अन्य घटक पक्षांचा जास्त पाठिंबा आहे. यामुळे महायुतीतर्फे आंबेकर व केरकर यांचा विजय निश्चित आहे. मात्र विरोधी पक्षाकडे असलेले १0६ चे संख्याबळ पाहता त्यांनाही आठ मते कमी पडत आहेत. ही आठ मते त्यांना फोडावी लागतील. तसे झाल्यास अपक्षांना चांगलाच 'भाव' येणार आहे.