मुंबईतील क्रॉस, ओव्हल मैदान आणि स.का. पाटील व किलाचंद उद्यानातील पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या झडपा आणि नियंत्रण कक्षांना दहशतवाद्यांचा धोका आहे, असे मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने सुचवल्यामुळे आणि ओव्हल मैदान ट्रस्टींनी पाठपुरावा केल्याने येथे स्टीलच्या तारेचे साखळी जोड पद्धतीने कुंपण घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पाणीपुरवठा प्रकल्प विभागाचा तब्बल १ कोटी ४0 लाख ३९ हजार रुपयांचा हा प्रस्ताव स्थायी समितीच्या येत्या बैठकीत चर्चेला येणार आहे. या कामासाठी मे. कमल एंटरप्रायझेस आणि मे. देव इंजिनीयर्स या निविदाकारांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी मे. कमल एंटरप्रायझेसची निविदा पालिकेच्या निविदा समितीने स्वीकारली आहे. दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा करणार्या जुनाट जलवाहिन्यांना बळकटी आणण्यासाठी तसेच जल वितरणाचा दर्जा वाढवण्यासाठी मलबार टेकडी ते क्रॉस मैदान दरम्यान बोगदा बांधण्याचे काम पालिकेने पूर्ण केले आहे. पाणीपुरवठा प्रकल्पाच्या या झडपा आणि नियंत्रण कक्षाला दहशतवाद्यांकडून धोका आहे, असे दहशतवाद विरोधी पथकाने सुचवल्यानंतर पालिकेने मृदू लोह तारेचे हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मे. कमल एंटरप्रायझेसने पोलिसांच्या फोर्स वन एचक्यू आणि अर्बन काऊंटर टेररिझम ट्रेनिंग सेंटर येथे असलेल्या भूखंडावर लोखंडी तारेचे आणि जाळीचे कुंपण बांधण्याचे काम पूर्ण केले आहे.