मुंबई / अजेयकुमार जाधव
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी होऊन त्या मध्ये ते दोषी आढळले आहेत. त्यांनी खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच त्यांच्यामुळे सिपिएस अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. यामुळे टावरी यांना त्यांच्या पदावरून त्वरित हटवावे असे आदेश वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले आहेत. तरीही अद्याप कोणतीही कारवाही करण्यात आलेली नसल्याचे समजते.
मिळालेल्या माहिती नुसार २०१४ मध्ये सीपीएस अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती.याबाबत नागपूर येथे उच्च न्यायालयात जनहित याचिकासुद्धा दाखल झाली आहे. डॉ. टावरी यांनी यावेळी शासनाचे आदेश दुर्लक्षित केले होते. सामान्य प्रशासन विभागाने सन २०१० मध्ये डॉ. टावरी यांची चौकशी केली होती यामध्ये १८ डिसेंबर १९८७ मध्ये टावरी यांनी पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता मिळविण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज केला होता. या अर्जामध्ये प्रथम नियुक्तीचा दिनांक फेब्रुवारी १९७९ असा नमूद केला होता. वास्तविक पाहता त्यांची नियुक्ती १०/७/१९८४ रोजी झाली होती. हि बाब त्यांनी १९९५ ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केलेल्या अर्जामध्ये स्पष्ट होत आहे. या अर्ज मध्ये त्यांनी १९८४ ला एमडी पदवी घेतल्याचेही म्हटले आहे. असेच त्यांनी दिलेल्या माहिती वरून विद्यापीठाला खोटी माहिती दिल्याचे चौकशी मध्ये सिद्ध झाले आहे.
२६/११/१९८८ ते २६/११/१९९२ या कालावधीत टावरी हे प्रशिक्षणासाठी रजा घेवून ओमान सरकारच्या सेवेत क्षकिरण शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. असे असताना त्यांनी ८२ ते ८८ या कालावधीत शासकीय वनैद्यकिय महाविद्यालय, नागपूर येथे अधिव्याख्याता पदावर कार्यरत असल्याचे विद्यापीठाला सांगून दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. याबाबत अवर सचिव भा. ज. गाडेकर यांनी १७/५/२०१२ ला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते परंतू टावरी यांनी आपले म्हणणे मांडले नसल्याने २२ नोव्हेंबर २०१२ ला स्मरणपत्र देवून आपले म्हणणे मांडा असे सांगितले आहे. यामुळे या प्रकारणात टावरी हे स्पष्ट पाने दोषी आढळत असल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री आव्हाड यांनी टावरी यांना त्वरित पदावरून हटवावे असे आदेश दिले आहेत. याबाबत टावरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयतन केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.