शिवसेनेच्या १५१ जागांचा हट्ट पुरवण्यास आम्ही असमर्थ आहोत, असे म्हणत भाजपने गुरुवारी संध्याकाळी महायुती तुटल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच, काँग्रेस आपला १४४ जागांचा हक्क पूर्ण करीत नसल्याचे कारण देत राष्ट्रवादीनेही आघाडी तोडल्याची घोषणा केली. राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता आहे.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती व आघाडी ही विचारांवर आधारित असल्याचे स्पष्ट करत जागावाटपांचा तिढा मित्रपक्षांच्या हट्टीपणामुळे न सुटल्याचे सांगितले. युती वाचविण्याचा आम्ही किती अटोकाट प्रयत्न केला याचे स्पष्टीकरण भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिले तर, युती तुटल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादीने धर्मनिरपेक्षतेसाठी आघाडी टिकविण्यासाठी खाल्लेल्या खस्तांची माहिती खासदार प्रफुल पटेल यांनी दिली तर, आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी करून अगदी भाजपसारखाच सेम टू सेम शो करत महाराष्ट्रातील मतदारांसमोर पाच पक्षांचे पर्याय उपलब्ध करून दिले.