अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या 64 व्या वाढदिवसानिमित्त गांधी नगरला जाऊन आई हिराबाई यांची भेट घेतली. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर मोदींचा हा पहिलाच वाढदिवस आहे. मोदी मंगळवारपासून गुजरात दौऱ्यावर आहेत. मोदींच्या आईंनी जम्मू-काश्मिरमधील पुरग्रस्तांसाठी पंतप्रधान रिलीफ फंडाला पाच हजार रुपयांची मदत दिली आहे.
मोदींना यापूर्वीच आपला वाढदिवस साजरा करणार नाही आणि कार्यकर्त्यांनाही साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. वाढदिवसासाठी आयोजित कार्यक्रमांवर होणारा खर्च जम्मू काश्मिरच्या पुरग्रस्तांना मदतीसाठी निधी म्हणून देण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आज भारत दौऱ्याची सुरुवात गुजरातमधून करणार आहेत. त्याठिकाणी मोदी त्यांचे स्वागत करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी देश-परदेशातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीही मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.