मुंबई : आमचे सरकार महाराष्ट्रात आल्यास नशा, दगा, भ्रष्टाचार, बेरोजगार, लोड शेडींग मुक्त महाराष्ट्र तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन महाशक्तीची घोषणा करताना डॉ. राजेंद्र गवई यांनी दिले.
रिपाई (गवई गट ), अवामी विकास पार्टी, ओबीसी, एन टी पार्टी, मायनोरीटी, डेमोक्रेटिक पार्टी, आझाद विदर्भ सेना, रिपब्लिकन क्रांती दल यांनी एकत्र येउन नव्या महाशाक्तीचा प्रयोग केला आहे. राज्यामध्ये महाशक्ती आल्यास ५ रुपयात नाश्ता , १० रुपयात पोटभर जेवण देण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक दोन वर्षात पुर्ण करण्यात येईल असे गवई यावेळी म्हणाले. तसेच जनतेला पर्याय हवा आहे, त्यामुळे जनता आम्हाला चांगले मतदान करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ह्या महाशाक्तीशिवाय यंदा मुख्य मंत्री होणार नाही असेही कोकरे यावेळी म्हणाले. तसेच यावेळी महाशक्तीच्या वतीने २५ कलमी कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली. या वेळी त्यांच्या सोबत समशेर खान , संजय कोकरे , सहदेवराव तायडे, सुबोध वाघमोडे असे विविध परतीचे अध्यक्ष उपस्थित होते.