मुंबई महानगर पालिकेतील युतीची सत्ता धोक्यात आली आहे. महापालिकेत आजवर भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात आली असली तरी भाजपनेच आता फारकत घेतल्यामुळे शिवसेना एकाकी पडणार आहे. मात्र, आता भाजपच विरोधी गटात गेल्यामुळे शिवसेनेला महापालिकेतील कामकाज संभाळणे डोईजड होणार असून याचा सर्वाधिक फरक हा बैठकांमध्ये मंजूर करण्यात येणा-या प्रस्तावांवर होणार आहे. त्यामुळे शिवसेनेची महापालिकेतील आर्थिक गणिते आता चुकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेत मागील २२ वर्षापासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. प्रत्यक्षात १९८९पासून शिवसेना आणि भाजपची युती असली तरी १९९२मध्ये या युतीने मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढवून सत्ता मिळवली होती. मात्र, तेव्हापासून सत्तेत असलेल्या युतीने या विधानसभा निवडणुकीत काडीमोड घेतल्यामुळे यापुढे भाजपच्या मदतीविना आणि सहकार्याविना महापालिकेचे कामकाज चालवावे लागणार आहे.
सुधार, शिक्षण समिती अध्यक्ष राजीनामा देणार ?
पालिकेत सुधार समिती आणि शिक्षण समितीही भाजपकडे आहे. सुधार समिती अध्यक्षपदी उज्ज्वला मोडक आणि शिक्षण समिती अध्यक्षपदी विनोद शेलार हे निवडून आले असून युतीच तोडल्यामुळे हे पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानुसार, आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांने दिलेल्या माहितीनुसार, पालिकेत भाजपकडे असलेल्या समित्यांचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा देतील. मात्र, अद्याप तशा कोणत्याही सूचना दिलेल्या नसून लवकरच हे आदेश त्यांना दिले जातील आणि ते राजीनामा देतील, असे त्यांनी म्हटले आहे.