मोडक सागरात लेक ट्यापिंग यशस्वी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2014

मोडक सागरात लेक ट्यापिंग यशस्वी

मुंबईकरांना आता ३0 हजार दशलक्ष लिटर पाणी अधिक मिळणार
मोडक सागर जलाशयातून अतिरिक्त पाणी शहरात आणण्यासाठी मुंबई महापालिकने गेल्या एक वर्षापासून आखलेल्या महत्त्वाकांक्षी सरोस्पर्शाचा अखेरचा टप्पा बुधवारी यशस्वीपणे पार पडला. अवघ्या दोन सेकंदांच्या या स्फोटामुळे तीन मीटर व्यासाच्या खडकाला भगदाड पडून त्यातून २0 मीटर प्रति सेकंदाने ४.१ व्यासाच्या मुख्य बोगद्यात विस्तीर्ण जलाशयातील पाण्याने प्रवेश केला. यामुळे मुंबईकरांना आता ३0 हजार दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. पाऊस कमी पडला तरी हा पाणीसाठा जवळपास एक महिना वापरता येणार आहे. 

मोडक सागर सरोवरात १५६, १४६ आणि १३६ मीटर खोलीवर तीन आगाम बोगदे खणण्यात आले आहेत. या बोगद्यांतील पाणी षट्कोनी आदान विहिरीतून ४.१ व्यासाच्या आणि सहा हजार ७७३ मीटर लांबीच्या मुख्य बोगद्यातून बेलनाला येथील विहिरीतून ३ मीटर व्यासाच्या जलवाहिनीतून भांडुप उदंचन केंद्राकडे शुद्धीकरणासाठी जाणार आहे. पण त्यासाठी जलाशयातील १00 मीटर खोलीवर असलेल्या ३ मीटर उंचीचा आणि तीन मीटर व्यासाचा खडक १८0 किलोग्रॅम जिलेटीन स्फोटके आणि डेटोनेटर्स लावून फोडण्यात आला. यालाच सरोस्पर्श (लेक टॅपिंग) संबोधतात. गेले वर्षभर त्याची पूर्वतयारी सुरू होती. सरोस्पर्श करणारी मुंबई महापालिका देशातील पहिलीच आहे. 

१00 किलोमीटर्स लांबीचे जलबोगदे बांधणारी मुंबई महापालिका ही पहिलीच आहे, असे कौतुकोद्गार महापौरांनी काढले. जून, जुलैत पाऊस कमी झाला तरी मुंबईकरांना या सरोस्पर्शामुळे व्यवस्थित पाणी मिळणार आहे. हा प्रयोग करणारे अभियंते व सल्लागार दीपक मोडक, रजनीश शुक्ला यांचीही त्यांनी प्रशंसा केली. 

'देशातील कोणत्याही पालिकेत न झालेला हा यशस्वी प्रयोग आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी आणि मुंबईकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे,' अशी प्रतिक्रिया पालिकेच्या आयुक्तांनी व्यक्त केली. 'यामुळे यापुढे जलाशयातील चार मीटर जादा पाणीसाठा वापरता येणार आहे. मोडक सागर धरणातील पाण्याची पातळी कमी करून १५६ मीटर व १४६ मीटर उंचीवरील बोगदे यापूर्वीच धरणाशी जोडले असून, ते २८ मार्च २0१४ रोजी कार्यान्वित झाले आहेत,' असे त्यांनी सांगितले. 

जून, जुलैत पाऊस कमी झाल्यास मोडक सागरमधून सोडण्यात येणारे पाणी कमी सोडावे लागते. पण यापुढे मध्य वैतरणा धरणातील पाणी मोडक सागरमध्ये सोडण्यात येणार असल्याने व सरोस्पर्शामुळे मोडक सागरच्या खालच्या पातळीपर्यंत गेलेले पाणीही यापुढे मुंबईकरांना देता येणार आहे. सरोस्पर्शामुळे मोडक सागरमधील आणखी चार मीटर पाण्याचा वापर एक महिन्याच्या कालावधीसाठी करता येणार आहे, असे कुंटे यांनी पत्रकारांना सांगितले. 

पालिकेच्या लेक ट्यापिंग मध्ये राजकीय मानापमान
मुंबई महानगर पालिकेद्वारे मोडक सागर मध्ये मोठा गाजा वाजा केल्या जाणाऱ्या लेक टॅपिंगला सत्ताधारी महायुतीमधील भाजपचे राज्य अध्यक्ष यांना देवेंद्र फडणवीस यांना पालिकेने निमंत्रणच पाठवले नसल्याने या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकाराबाबत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें यांनी मौन बाळगले आहे. सत्ताधारी भाजपच्या राज्य अध्यक्षाला निमंत्रणच पाठवले गेले नसल्याने पालिकेच्या कार्यक्रमाचे शिवसेनाकरण केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. या कार्यक्रमाला फडणवीस का आले नाहीत, याचे उत्तर ठाकरे यांनी दिले नसले तरी पालिकेतील भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी, 'पालिकेने फडणवीस यांना निमंत्रणच पाठवले नाही,' असा गौप्यस्फोट केला आहे. 

Displaying BMC_1020.JPGDisplaying IMG_7693.JPG

Post Bottom Ad