मुंबई : उपनगरीय रेल्वेचे सर्वात महत्त्वाचे आणि प्रवाशांची सदैव ये-जा असणारे छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच सीएसटी स्थानक येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात तीन दिवस सलग बंद राहण्याची शक्यता आहे. सीएसटी येथून हार्बर मार्गावरील गाड्या सुटणार्या प्लॅटफॉर्म १ आणि २ ची लांबी वाढविण्याचे काम या दोन महिन्यांपैकी एका महिन्यात हाती घेण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सक्तीची रजा मिळण्याची शक्यता असली तरी मध्य रेल्वेकडे जादा डबे नसल्यामुळे १२ डब्यांच्या लोकल धावण्यास विलंब होणार आहे. सीएसटी ते मस्जिद बंदर स्थानकांदरम्यानचा जुना पूल पाडण्यासाठी २00९ मध्ये ३ दिवस वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे.हार्बर मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यासाठी हार्बर मार्गावरील सर्वच प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम सध्या मुंबई रेल्वे विकास महांमडळातर्फे (एमआरव्हीसी) हाती घेण्यात आले आहे. हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम गेल्या २ वर्षांपासून करण्यात येत आहे.
वडाळा, रे रोड, डॉकयार्ड रोड आणि सीएसटी ही चार स्थानके वगळता इतर सर्व स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सीएसटी स्थानकातील हार्बर मार्गावरील फ्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या टोकाला रेल्वेची नवीन प्रशासकीय इमारत आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे शक्य नाही. त्यामुळे प्लॅटफॉर्म २ ची लांबी वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तसेच फ्लॅटफॉर्म १ वर येणार्या गाड्यांतील शेवटच्या तीन डब्यांतील प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उतरविण्याची योजना मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीने आखली आहे. या योजनेशिवाय इतर कोणताही पर्याय नसल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश सक्सेना यांनी सांगितले. या योजनेमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वरील रेल्वे रुळांची ठेवणही बदलावी लागणार आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्म ३ वरील प्रसाधनगृह तोडून तो प्लॅटफॉर्म रुंदीने तोडा कमी करावा लागणार आहे. या सर्व कामांसाठी या फ्लॅटफॉर्मवरील वाहतूक तब्बल ३ दिवस बंद ठेवावी लागणार आहे.