मुंबई : ‘लव्ह’चा ‘जिहाद’शी काहीही संबंध नसल्याचे वक्तव्य आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादउल मुसलमीन संघटनेचे नेते आणि आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी येथे केले. नागपाडा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ओवेसी यांचे भाषण ऐकण्यास हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता.
या वेळी ओवेसी म्हणाले, ‘प्रेमाशी जिहादचा संबंध जोडणारे योगी आदित्यनाथ कोणत्या काळात जगत आहेत? मोघल काळात राणी जोधा आणि राजा अकबर यांनी लग्न केले, त्यावेळी अकबर या मुस्लिम कुटुंबाने हिंदू सुनेचा स्वीकार केला. त्यावेळी यांनी टीका केली नाही. आता मात्र घाणेरडे राजकारण करत या मुद्द्याचा प्रचारासाठी वापर करीत आहेत.’
दरम्यान भारतीय जनता पार्टीवर टीका करताना ओवेसी म्हणाले, ‘केंद्रात भाजपा सरकार आल्यापासून बेरोजगारी, महागाई आणि गरिबी हे मुद्दे दूर झाले आहेत,’ ‘देश हिंदूंचा आहे’, ‘सर्व भारतीय हिंदू आहेत’, अशी मुस्लिमविरोधी वक्तव्ये करण्यातच भाजपा धन्यता मानत आहे.’राज्यात निवडणूक लढून येथील मुस्लिम उमेदवारांना पाडण्याचा एआयएमआयएमचा इरादा नाही. शिवाय महायुतीच्या उमेदवारांना जिंकून देण्याचा पक्षाचा मानस नाही. तर येथील मुस्लिम समाजाला एकत्र आणून न्याय मिळवून देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुस्लिम मतांशिवायही जिंकण्याचा दावा करणाऱ्यांना आपली शक्ती मतपेटीतून दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी प्रथम सर्व मुस्लिमांनी मतदार यादीतील नाव तपासून नाव नोंदणी करण्याचे आवाहनही ओवेसी यांनी केले.