मुंबई - विधानसभेच्या उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी आज सर्वच पक्षांत उमेदवारीवरून प्रचंड गोधळ उडाल्याचे चित्र पुढे आले. सर्व मोठ्या आघाड्या व युत्या भंग पावल्या नंतर सर्वच पक्षांत उमेदवारांची शोधाशोध काल रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. कुणाला एबी फॉर्म दिला याची जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत कल्पनाच येत नव्हती. त्यामुळे अनेक मतदारसंघांतून अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नेमका कोणाचा कोण उमेदवार हे शोधावे लागत होते.
लातूर आणि नांदेडमध्ये कॉंग्रेसमध्ये प्रचंड गोंधळ माजला होता. लातूर ग्रामीण मधून कॉंग्रेसने त्रिंबक भिसेंना उमेदवारी काल रात्री जाहीर केली होती पण आज तेथे कै विलासराव देशमुखांचे चिरंजीव धीरज देशमुख यांचे नाव पुढे आले. ते अर्ज भरायलाही निघाले मात्र भिसेंच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराला जोरदार हरकत घेतल्याने तिथे तणावाचे वातावरण तयार झाले. धीरज यांचे मोठे भाऊ राज्यमंत्री अमित देशमुख शेजारच्याच मतदारसंघात उमेदवार आहेत हे विशेष. कार्यकर्त्यांच्या हरकती नंतर अखेरच्या क्षणी धीरज यांचे नाव मागे घेऊन भिसे यांनाच उमेदवारी बहाल करण्यता आली.
नांदेडमध्ये खा.अशोक चव्हाण हे उमेदवारी अर्ज भरणार असे वातावरण सकाळी होते. तशा बऱ्याच चर्चा सुरु होत्या. पण तिथे पक्षाकडून नरेंद्र चव्हाणांचे नाव आलेले होते. अशोक चव्हाणांनी दिल्लीत पत्नी अमिता यांना भोकर मधून उमेदवारी मिळवण्याचा चंग बांधलेला होता. अखेर त्यांनी स्वतः अर्ज भरण्याची तयारी केली. राज्यातून कॉंग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आलेले आहेत त्यातील एक अशोक चव्हाण आहेत. अशोक चव्हाणांच्याच मतांमुळे शेजारच्या हिंगोली या मतदारसंघातून राजीव सातव हे खासदारकीला विजयी झाले होते. अशोक चव्हाणांनी आमदारकी साठी अर्ज भरणे हा पक्षासाठी निराळा संकेत ठरेल हे लक्षात घेऊन अखेरच्या क्षणी पक्षाने त्यांच्या आग्रहा नुसार अमिता चव्हाणांना भोकरमधून उमेदवारी दिली.
शिवसेने मधून माजी आमदार अनंत तरे यांनी अखेरच्या क्षणी भाजपात धाव घेतली. त्यांनी सेनेचे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बंड केले. तर कॉंग्रेसचे मंत्री संजय देवतळे यांनी बंड केले असून त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. देवतळे यांनी कॉंग्रेसकडे चंद्रपूरमधून पक्षाकडे तिकीट मागितले होते त्यांना तिकीट देण्यात आले नाही . तेंव्हा त्यांनी लगेचच भाजपात उडी घेतली आहे. कालच राष्ट्रवादीचे राज्यमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत राष्ट्रवादीला रामराम करून सेनेत प्रवेश केला. कॉंग्रेसचे राज्यमंत्री बंटी पाटील यांचे बंधू व डि वाय पाटील यांचे धाकटे चिरंजीव अजिंक्य पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांनी थेट क-हाड मधून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात निवडणुकीत उडी घेतली आहे. दलित नेते कै टी एम कांबळे यांचे चिरंजीव कनिष्क यांनी लातूरमधून शिवसेनेची उमेदवारी घेत सेनेत प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे पदाधिकारी बसवराज पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून लातूर जिल्ह्यातून उमेदवारी मिळवलेली आहे तर औरंगाबादेत सेनेचे मोठे कार्यकर्ते असणारे किशन तनवाणी यांनी भाजपात उडी घेतली आहे. मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेनेला रामराम करीत मनसेत प्रवेश केला असून विनोद घोसाळकरांच्या विरोधात त्या निवडणूक लढवत आहेत.
वादग्रस्त बिल्डर दीपक मानकर यांनी तिकिटासाठी कॉंग्रेस मधून राष्ट्रवादीत प्रवेश केला पण त्यांच्या उमेदवारीमुळे पुण्यातील कसबा मतदारसंघात निराळाच घोळ झाला आहे. पक्षाने तेथे प्रवक्ते अंकुश काकडे यांना आधीच उमेदवारी व ए बी फॉर्म दिलेले होते. तिथे आता मानकर व काकडे या दोघांचेही ए बी फॉर्म दाखल झालेले आहेत. भाजपाला बंडाची झळ लागलेली आहे. नागपूर दक्षिणचे भाजपा जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे यांना उमेदवारी नाकारण्यात आली तेंव्हा त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या क-हाड दक्षिण या मतदारसंघातच त्यांना अडकवून टाकण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेची इच्छा व प्रयत्न होते. त्यांनी कॉंग्रेसचे तिथले विद्यमान आमदार विलासकाका उंडाळकरांना तिकीट देऊ केले होते. मात्र विलासकाकांनी पक्ष प्रवेशास नकार दिला. ते अपक्ष उभे राहिलेले आहेत. राष्ट्रवादीने तिथे राजेंद्र यादवांना तिकीट दिले आहे भाजपाने राजघराण्यातील एका युवकाला तिकीट दिले आहे तर डी वाय पाटलांचे चिरंजीव अजिंक्य हेही तिथून शिवसेनेकडून लढणार आहेत