काँग्रेससोबत आघाडी करण्याची समाजवादी पक्षाची इच्छा - अबू आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2014

काँग्रेससोबत आघाडी करण्याची समाजवादी पक्षाची इच्छा - अबू आझमी

मुंबई - जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व धर्मनिरपेक्षता जिवंत ठेवण्यासाठी समाजवादी पक्षाची कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी होणे गरजेचे आहे. आम्ही कॉंग्रेस आघाडीकडे सहकार्याचा हात पुढे केला आहे; मात्र त्यांच्याकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी बुधवारी दिली. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. 

शेतकरी कामगार पक्षप्रणीत डाव्या आघाडीचा अनुभव वाईट असल्याचा शेराही त्यांनी मारला. ही आघाडी केवळ निवडणुकीपर्यंत राहते. त्यानंतर ती गायब होते. विधिमंडळात कोणत्याही प्रश्‍नावर अशी आघाडी एकत्र येत नाही, असा अनुभव त्यांनी सांगितला. राज्यातील धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी आघाडी होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले; मात्र आघाडी करणे ही आमची कमजोरी समजू नका, असा इशारा त्यांनी दिला. 


शिवसेना व भाजप यांची नीती व नियत दोन्ही वाईट आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची नियत वाईट असली तरी नीती चांगली आहे, असे मत व्यक्त करीत जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत आघाडी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. एमआयएम पक्षामुळे धर्मनिरपेक्ष मते विभागण्याची भीती असल्याचे त्यांनी मान्य केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आकर्षक घोषणा करून अल्पसंख्याक समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुस्लिमांना मदत नको; मात्र त्यांना न्याय द्यावा, असे ते म्हणाले. 

शिवाजीनगर मानखुर्द, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्‍चिम, नवापूर या चार जागांवर पक्ष लढणार आहे. त्याशिवाय आघाडी झाल्यास मालेगावची जागाही मिळावी, असे अबू आझमी यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष फरहान आझमी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.

Post Bottom Ad