पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 September 2014

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर महापालिका शाळांमधील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिवसेनेकडून मोफत टॅब देण्यात येणार असून ई-प्रबोधन योजना राज्यभरात लागू करण्यात येईल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. 

शिवसेना भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव यांनी व्हिजन डॉक्युमेंटचा पुढचा भाग जाहीर केला. आठवी ते दहावीचा अभ्यासक्रम असलेले एसडी कार्डही विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोलर चार्जरही उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी इंटरनेटची आवश्यकता नसून सर्व भाषांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांना आम्ही टीव्ही, फ्रिज वा एसी देणार नाही. मात्र या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी लागणारी ताकद मात्र जरूर देऊ. या ​विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण दिल्यास ते त्यांच्या पायावर निश्चित उभे राहतील, पैशाची उधळपट्टी करण्याऐवजी हिताच्या गोष्टी करण्यावर भर राहील, असेही ते म्हणाले. सत्ता दिली तर महापालिका शाळांबरोबरच आश्रमशाळा, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्येही मोफत टॅब दिले जातील, असे उद्धव यांनी सांगितले. शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आयएएस तसेच आयपीएस परीक्षांच्या मोफत प्रशिक्षण वर्गाला चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच ग्रामीण भागात ९ सेंटर्स सुरू करून व्हि​डिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ​विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad