मुंबई महानगर पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात डॉक्टरांकडून झालेल्या हलगर्जी पणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि सुर्य नगर येथील पारशीवाडी गणेशोत्सव मंडळाने जाब विचारल्यावर दोषी डॉक्टरवर कारवाही करण्याचे लेखी आश्वासन रुग्णालयाच्या डीन विद्या ठाकूर यांनी दिले आहेत.
राजावाडी रुग्णालयात सोमवार सकाळी ५. ३० वाजता विक्रोळी सूर्या नगर येथील दत्ताराम लक्ष्मण सकपाळ यांना छातीत दुखू लागल्याने दाखल करण्यात आले. रुग्णालयामधील इमरजन्सीसाठी असलेल्या ४० नंबर वार्ड मध्ये या रुग्णाला आणले असता ड्युटीवर असताना डॉ. जाधव या झोपलेल्या होत्या. रुग्णाच्या छातीत दुखत आहे. असे सांगूनही त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांचा इसीजी काढण्याची सुविधा नसल्याची करणे देवून टाळाटाळ केली. तसेच जर इतकीच घाई असेल तर सायन रुग्णालयात जायचे असा सल्ला उपस्थितांना दिला. यामुळे सकाळी ९. १५ वाजता सकपाळ यांचे आयसीयू मध्ये निधन झाले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. याच कालावधीत या ठिकाणी नगरसेविका अश्विनी मते आणि नगरसेवक दीपक हंडे आले आणि हॉस्पिटलच्या डीन विद्या ठाकूर यांच्याशी संपर्क करून दोषी डॉक्टर वर कायदेशीर कारवाही करण्याचे लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. तसेच लेखी कारवाहीचे आश्वासन दिल्या नंतरच मृतदेह ताब्यात घेण्यात येईल असे स्पष्ट केल्यावर विद्या ठाकूर यांनी दोषी डॉक्टर वर चौकशी करून कारवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
दरम्यान याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अध्यक्षा गीता गवळी यांची भेट घेवून घडलेला प्रकार निदर्शनास आणून कारवाही करण्याची मागणी करण्यात येईल असे अश्विनी मते आणि दीपक हंडे या नगरसेवकांनी सांगितले आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सकपाळ यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याने पालिकेने पुढाकार घेवून सकपाळ यांच्या दोन मुली शिक्षण घेत असल्याने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.