मुंबई - कॉंग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करीत शुक्रवारी आमदारपदाचा राजीनामा दिला. पनवेल मतदारसंघातील अनेक समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केले नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. खारघर-कामोठे हा टोलनाका रद्द करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य न केल्याने ठाकूर यांनी अखेर राजीनामा दिला.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी हा टोलनाका रद्द करण्याचे आश्वासन काही दिवसांपूर्वी दिले होते; मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नाही. सिडको आणि जेएनपीटीच्या प्रकल्पग्रस्तांबाबत चार वर्षांत मुख्यमंत्र्यांनी एकही बैठक घेतली नसल्याची खंतही ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. खारघर-कामोठेदरम्यानच्या टोलनाक्यावर स्थानिक वाहनमालकांकडून टोल घेऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली होती. दोन दिवसांपूर्वीच, "सरकारने निर्णय घेतला नाही, तर विधानसभा निवडणूक लढणार नाही‘, असा इशारा ठाकूर यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांसोबतची बोलणी अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी शुक्रवारी आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिला.
शुक्रवारी दुपारी ठाकूर यांनी राजीनामा दिल्यानंतर सायंकाळी पाच वाजता निवडणूक आचारसंहिता लागू झाली. ठाकूर यांनी निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली असली, तरी ते कॉंग्रेसमधून बाहेर पडतील, अशीही चर्चा आहे. मात्र ठाकूर यांनी, आपण कॉंग्रेसमध्येच राहणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.
शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचा विधान परिषदेचा कार्यकाल संपून आज सहा महिने पूर्ण झाले होते. मंत्रिपद टिकविण्यासाठी त्यांना या कालावधीमध्ये विधानसभा अथवा विधान परिषदेवर निवडून जाणे भाग होते. या दरम्यान, विधानसभेवर त्यांना संधी मिळाली नाही. तसेच, आजच आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार सोडला. त्यामुळे या सरकारच्या संपूर्ण कार्यकाळात त्या अखेरपर्यंत मंत्री राहिल्या.