अडीच वर्षांपूर्वी राजकारणात येऊन नगरसेवक बनलेल्या स्नेहल आंबेकर यांना आरक्षणामुळे थेट महापौरपदाची लॉटरी लागली आहे. या पदासाठी शिवसेनेतर्फे आंबेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला.
सुनील प्रभू यांचा महापौरपदाचा कालावधी ८ सप्टेंबरला संपत असून, नवीन महापौरांची निवड करण्यासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक होत आहे. शिवसेना-भाजप युतीकडे असलेल्या स्पष्ट बहुमतामुळे आंबेकर यांची निवड होण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. महापौरपदासाठी काँग्रेसकडून डॉ. प्रियतमा सावंत यांनी, तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या अलका केरकर व राष्ट्रवादीचे चंदन शर्मा यांनीही आपले उमेदवारी दाखल केले. अनुसूचित जातीसाठी आरक्षण असलेल्या लोअर परळ येथील वॉर्ड क्र. १९४मधून आंबेकर या निवडून आल्या असून, नगरसेविका म्हणून त्यांची पहिली टर्म आहे. बी. कॉमपर्यंत शिक्षण झालेल्या आंबेकर यांनी एलआयसीमध्ये सीनिअर सेल्स एक्झिक्युटिव्ह पदावर काम केले आहे. त्यांचे पती शिवसेनेचे उपशाखाप्रमुख आहेत. उपमहापौरपदाच्या उमेदवार अलका केरकर या वांद्रे पश्चिम येथील प्रभाग ९३मधून निवडून आल्या आहेत. नगरसेवकपदाची त्यांची ही पहिलीच टर्म आहे. त्या मागील १८ वर्षांपासून राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. विविध स्वयंसेवी संस्थांशी त्या संबंधित आहेत.
मुंबईत महिलांसाठी पुरेशी प्रसाधनगृहे नसल्याने महिलांना गैरसोय सहन करावी लागते. त्यामुळे महापौरपदाच्या कारकिर्दीत 'राइट टू पी'ला आपण प्राधान्य देणार आहोत. महिला सुरक्षा, आरोग्य सेविकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असून, व्हर्च्युअल क्लासरूमची संख्या वाढवण्यावर भर देणार असल्याचा मनोदय आंबेकर यांनी व्यक्त केला.
सत्ताधारी
शिवसेना ७८
भाजप ३२
अभासे व युती समर्थक १०
विरोधक
काँग्रेस ५२
मनसे २७
राष्ट्रवादी १३
समाजवादी पक्ष ९
अपक्ष ४
शेकाप १